सांगोला तालुकाराजकीय

सांगोला उपसा सिंचन योजनेमुळे वंचित भागाचा कायापालट होणार ; मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा विश्वास;”आमदार आपल्या दारी” दुसऱ्या दिवशी आजी माजी आमदारांची १० गावांना भेट ; प्रलंबित कामाचा निपटारा

वर्षानुवर्ष प्रलंबित असणारा सांगोला तालुक्याचा शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळपास मार्गी लागला आहे. आगामी काळात सांगोला उपसा सिंचन योजनेतून मिळणाऱ्या २ टीएमसी पाण्यातून सांगोला तालुक्यातील लोटेवाडी, इटकी, कटफळ, बागलवाडी, सोनलवाडी, अचकदानी, लक्ष्मीनगर, जाधववाडी, नरळेवाडी व वाकी शि. या गावांचा कायापालट होणार असल्याचा विश्वास मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. अनेक वर्ष बंद अवस्थेत असलेली आणि शासनाने काळ्या यादीत टाकलेली उजनी उपसा सिंचन योजना आमदार शहाजीबापू पाटील आणि मी स्वतः प्रयत्न करून पुन्हा मार्गी लावली असल्याचेही दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आवर्जून सांगितले.

आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील या आजी-माजी आमदारांचा “आमदार आपल्या दारी” हा शासकीय उपक्रम सध्या सुरू आहे. या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी तालुक्यातील वाकी, एखतपूर, सोनलवाडी, बागलवाडी, लक्ष्मीनगर, अचकदानी, लोटेवाडी, खवासपूर, इटकी, कटफळ शेरेवाडी या गावांना शनिवार दि २१ रोजी भेट दिली. या दरम्यान माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील बोलत होते. यावेळी सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते उद्योगपती भाऊसाहेब रुपनर, तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, तहसीलदार अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे महावितरणचे उप अभियंता आनंद पवार आदीसह सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू म्हणाले, अनेक वर्षे सांगोला तालुक्याने शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष केला आहे तालुक्यातील शेतीला हक्काचे पाणी मिळवून देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न आणि जीवनमान उंचविण्यासाठी सध्या माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना सोबत घेऊन आपली लढाई सुरू आहे. २० वर्षांपासून बंद पडलेली उजनी उपसा सिंचन योजना पुनर्जीवित केली आहे. योजना मंजूर करून थांबणार नाही तर येत्या मार्च महिन्यापूर्वी या योजनेचे काम सुरू करून आगामी वर्षभरात या योजनेचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे अभिवचनही यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिले. दरम्यान आमदार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत दुसऱ्या दिवशीही आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांत जोश दिसून आला. गावोगावी नेत्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

चौकट ;

नागरिकांकडून आजी माजी आमदारांचे आभार..!

सांगोला तालुक्यातील सिंचन योजनांपासून वंचित असलेल्या लोटेवाडी, इटकी, कटफळ, बागलवाडी, सोनलवाडी, अचकदानी, लक्ष्मीनगर, जाधववाडी, नरळेवाडी व वाकी शि. या गावांसाठी बंद पडलेली योजना पुन्हा सुरू करून कार्यवाही गतिशिल केल्याबद्दल या गावातील नागरिकांनी आमदार शहाजीबापू पाटील आणि मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचे आभार मानले. व लोटेवाडी येथे याबद्दल आजी माजी आमदारांचा सत्कार करण्यात आला.

आम्ही विकासकामाचे राजकारण करतो, विकासकामात राजकारण करत नाही..!

सांगोला तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असताना संपूर्ण सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असतो. त्यामुळे आम्ही तालुक्याच्या विकासकामाचे राजकारण करतो, विकासकामात कधीच राजकारण करत नाही. दिपकआबा आणि माझ्या घराचे आणि कार्यालयाचे दरवाजे सामान्य जनतेसाठी नेहमीच खुले आहेत. आमची बांधिलकी जनतेशी आहे. तालुक्याच्या विकासासाठी आम्ही दोघेही वचनबद्ध आहोत ; आमदार शहाजीबापू पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!