आबासाहेबांनी संपूर्ण हयातभर निःपक्षपाती राजकारण केले. – डॉ.बाबासाहेब देशमुख

सांगोला(प्रतिनिधी):- गावागावांमध्ये गट -तट असतात, वेगवेगळे पक्ष असतात ..संघटना असतात परंतु आबासाहेबांनी विकासाची कामे करीत असताना गटा-तटाच्या व पक्षाच्या पलीकडे जाऊन काम केले आहे. आज काही विकास कामांमध्ये राजकीय हस्तक्षेप होताना दिसत आहे. गावगावच्या विकास कामांमध्ये राजकारण केले जात आहे. हे लोकशाहीला घातक आहे.पक्ष गट तट हे निवडणुकापुरते मर्यादीत ठेवले पाहिजेत. ज्यावेळी एखाद्या लोकप्रतिनिधींना निवडुन दिले की तो लोकप्रतिनिधी एखाद्या पक्षाचा नसतो तर संपूर्ण मतदार संघातील सर्व जनतेचा लोकप्रतिनिधी असतो. याचे मुर्ती मंद उदाहरण म्हणजे आबासाहेब होय. आबासाहेबांनी संपूर्ण हयातभर निःपक्षपाती राजकारण केले. शाश्वत विकास साधताना सर्व जाती धर्माचा, विविध समुहाचा व समाजातील शेवटच्या घटकाचा सुध्दा विकास व्हावा हे धोरण आबासाहेबांचे होते..उगीचच विरोधासाठी विरोध ते कधीही करीत नव्हते असे प्रतिपादन पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भाई.डॉ बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.

स्व.आबासाहेबांनी विकास कामांमध्ये राजकारण येऊ दिले नाही म्हणुन जनतेने त्यांना 55 वर्षे प्रदिर्घ काळ त्यांना आमदार म्हणुन स्विकारले..जनता-मतदार खुप हुशार व सुज्ञ असतात ते नेत्यांच्या वर्तनावर बारीक लक्ष ठेवून असतात फक्त ते बोलून दाखवत नसतात ज्या वेळी त्यांना दाखवुन देण्याची संधी येते तेंव्हा अशा अन्यायी वागणुकीला ते जशाच तसे लोकशाही मार्गाने उत्तर देत असतात.आजपर्यंत सांगोला विधानसभा मतदार संघाचा नावलौकीक स्व.आबासाहेबांनी उंचावला आहे ..तो उंचावलेला आलेख शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून आम्ही करीत राहणार आहोत व आबासाहेबांच्या निःपक्षपाती विकासाचे राजकारण करण्याची परंपरा पुढे अविरत चालु सुरु ठेवण्याचा संकल्पही भाई डॉ .बाबासाहेब देशमुख यांनी केला आहे.
स्व.गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांनी सांगोला विधानसभा मतदार संघाचे 11 वेळा नेतृत्व केले. त्यांनी राज्यातील व सांगोला विधानसभा मतदारसंघातील अनेक विकास योजना सभागृहात मांडुन त्या मार्गी लावल्या आहेत. विशेषत: शेतकर्यांच्या प्रश्नावरती आबासाहेबांचे विशेष लक्ष होते..रोजगार हमीसारख्या योजनांना आबासाहेबांच्या पुढाकाराने जन्म झाला.रोजगार हमीचा कायदाच तयार झाला.शेतकर्यासांठी फलोत्पादन अभियान राबवण्यासाठी अनेक उपाय व आर्थिक शासकीय मदत शेतकर्यांच्या पदरात पडावी म्हणून शासन दरबारी प्रयत्न करुन ती आर्थिक मदत मिळवुन दिली.
सांगोला विधानसभा मतदार संघातील जी विकास कामे झालेली आहेत ती.आबासाहेबांच्या अथक परिश्रमाने झाली आहेत. टेंभु-म्हैसाळ योजनेद्वारे कृष्णेचे पाणी शेतीसाठी सांगोल्यात आणुन शेतीच्या पाण्याचा प्रश्न बर्यापैकी सोडवला आहे.तसेच पिण्याच्या पाण्याची शिरभावी पाणी पुरवठा योजना मंजुर करुन घेऊन चंद्रभागेचे पाणी सांगोल्याला आणले.व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. अनेक गावांमध्ये रस्ते, समाजमंदीरे, शाळा, व्यायाम शाळा, पिण्याच्या पाण्याच्या योजना, बंधारे, विज डेपी, इत्यादी विकास कामे पक्षपात व राजकारण न करता केली आहेत. ऐवढी विकास कामे केली परंतु त्या विकास कामांमध्ये कधीही राजकारण आणले नाही.विकास कामे करताना गावचा विकास साधला गेला पाहिजे एवढे लक्ष ठेवून आबासाहेबांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.. कित्येक विकास कामे केली परंतु त्याचा गाजावाजा केला नाही…की त्याला प्रसिद्धी दिली नाही.राजकारण हे विकासासाठी करायचे असते याचे एकमेव उदाहरण म्हणजे आबासाहेब होय.

आबासाहेब विकास कामे करीत असताना कित्येक वेळा विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही विश्वासात घेत असत, चर्चा करीत असत..इतके स्वच्छ राजकारण करणारे नेते सध्या पहावयास मिळत नाहीत. राजकारणाचा स्तर उंचावण्यासाठी आबासाहेबांचे विशेष प्रयत्न असायचे.लोकशाहीमध्ये प्रत्येकांना आपले पक्ष वाढवण्याचा व पक्षाचा विस्तार करण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे.परंतु आपले पक्ष वाढवत असताना इतर पक्षांना त्रास होईल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास होईल असे आबासाहेब कधीही वागले नाहीत.एखादा सहयोगी पक्ष आसेल त्या पक्षाला किंवा विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना कधीही ते हेतुपुरस्कर त्रास देत नसत. इतर पक्षाबद्दल आकस ठेवत नसत. हे एक आदर्श राजकारणाचे उत्तम उदाहरण आहे.
स्व.आबासाहेबांच्या राजकीय वाटचालीची आजही इतर नेते अदबीने चर्चा करताना दिसत आहेत.त्यांच्या चारित्र्यसंपन्न राजकारणाची उदाहरणे देताना दिसत आहेत.अशा आदर्श राजकीय वाटचालीचा अभ्यास करुन त्यांच्या विचारांवरती वाटचाल केली तर राजकारणाकडे पहाण्याचा दृष्टीकोन आणखी चांगला होणार असल्याचे डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.