विद्यार्थ्यांनी सतत आनंदी राहावे- मिलिंद पत्की; सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मध्ये ‘ ताणतणावातून मुक्तता व बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना ‘ या विषयावर व्याख्यान संपन्न

सांगोला ( प्रतिनिधी): विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो.चांगल्या गोष्टीचे अनुकरण करत विद्यार्थ्यांनी व्यसनापासून आणि सोशल मिडिआ पासून दूर राहावे.भविष्यातील आव्हाने आणि वाढती स्पर्धा यामुळे ताणतणाव निर्माण होते,यासाठी वाचन,लेखनाची सवय असल्यास आपण आनंदी राहू शकतो. दैनंदिन जीवनात सर्वजण वेगवेगळ्या व्यापात व्यस्त असतात.यातून वेळेचे नियोजन करून पुरेसा प्रमाणात प्राणायाम व योगासने करून आरोग्य चांगले ठेवावे.आपल्या कडून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.इ.१० वी,इ.१२ वी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक ताण तणाव येऊ शकते.विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार,पुरेशी विश्रांती व नियमित व्यायामाने ताणतणाव कमी करून सतत आनंदी राहणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंग सांगोल्याचे सदस्य तथा माजी विद्यार्थी मिलिंद पत्की यांनी केले.
सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘ ताणतणावातून मुक्तता व बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना ‘ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जागंळे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्याध्यापक लक्ष्मण जागंळे यांच्या हस्ते मिलिंद पत्की यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी श्री.पत्की यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन व काही प्रात्यक्षिके सादर करून नेहमी आनंदी राहण्याचा मौलिक सल्ला दिला.
सदर कार्यक्रमास प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत रायचुरे यांनी केले तर प्रा.नवनाथ बंडगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.