कोळे गावचा जवान ओंकार करांडे देणार राष्ट्रपती ना सलामी

सांगोला तालुक्यातील कोळा येथील माजी सैनिक दत्तात्रय निवृत्ती करांडे यांचे सुपुत्र सध्या बेळगाव येथे कार्यरत असणारे इंडीयन आर्मी जवान ओंकार करांडे यांना, देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांना २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त सलामी देण्याचा मान मिळाला असल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
दिल्ली येथे इंडियन आर्मी मधून वेगवेगळ्या सेंटर मधून उत्कृष्ठ जवानांची निवड केली जाते, त्यामध्ये ओंकार याची निवड झाली आहे. वडील दत्तात्रय करांडे यांनी सुध्दा २४ वर्षे देशसेवा बजावली आहे. वडील सैन्यात, चुलते विष्णू करांडे व मामा तानाजी घेरडे पोलीस असलेने लहान पणापासूनच ओंकारला देशसेवेचा कौटुंबिक वारसा लाभला असल्याने त्याचे स्वप्न आर्मी मध्ये काम करण्याची होती. एप्रिल २०२१ मध्ये त्यांची मराठा लाईट इन्फंट्री बेळगांव येथे निवड झाली होती. त्यांनतर प्रशिक्षण कालावधी पूर्ण होताच दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रपती परेड साठी त्याची निवड झाल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडीयन आर्मी मधील जवान देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलामी देणार आहेत. या परेड साठी ओंकार करांडे निवडले गेले असल्याने कोळा गावात तरुण वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या तीन महिन्यांपासुन सलामीचा सराव दिल्ली येथे करत आहेत. २६ जानेवारी रोजी राष्ट्रपती पंतप्रधान यांना राजपथावर इंडीयन आर्मी सलामी देणार असल्याने कोळा गावाचे लक्ष आपल्या सुपुत्राकडे लागून राहिले आहे. त्याचे या यशाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून तसेच आजी-माजी सैनिक यांचेकडून अभिनंदन होत आहे.
[राजपथावरसलामी देणे प्रत्येक जवानाचे स्वप्न असते.मी २४ वर्षे इंडीयन आर्मीच्या माध्यमातून देशसेवा बजावली परंतु राजपथावर सलामी देण्याची संधी मला मिळाली नव्हती. माझ्या मुलाची निवड झाल्यामुळे माझी इच्छा पुर्ण होत आहे—दत्तात्रय निवृत्ती करांडे (माजी सैनिक)]