धान्य गोदाम परिसरातून वाळू वाहतूक करताना पकडलेला टेम्पोे नेला पळवून
सांगोला (प्रतिनिधी): महसूल विभागाच्या भरारी पथकाने अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना पकडलेला टेम्पो पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मंडल अधिकारी उल्हास पोळके यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, 25 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाने सोनंद येथील अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडून ती शासकीय धान्य गोदामाच्या परिसरात लावली होती. दरम्यान 10 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता गोदामाच्या परिसरात लावण्यात आलेल्या मोकळ्या दोन वाहनापैकी एक वाहन दिसुन आले नाही. म्हणुन त्यांनी वाहनाचा आजुबाजूस शोध घेतला असता वाहन कोठेही मिळुन आले नाही. शासकीय धान्य गोदाम परिसरातून विना नंबरचे वाहन कोणीतरी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची खात्री झाली. त्यानंतर पोळके यांनी सदरचा प्रकार तहसीलदार यांना सांगितला. नंतर त्यांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर एक महिन्यानंतर सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
