सावे येथील चव्हाण कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने शेळी भेट

सांगोला (प्रतिनिधी )- आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या सावे येथील चव्हाण कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने दोन पिलांची शेळी भेट देण्यात आली. तसेच त्यांच्या तिनही मुलांचा दहावी पर्यंतचा शैक्षणिक खर्चही आपुलकीने उचलला आहे.
सावे ता. सांगोला येथील श्रीमती मथुरा भिकाजी चव्हाण यांच्या पतीचे दीड वर्षांपूर्वी रस्ते अपघातात सांगोला येथे वाढेगाव नाक्याजवळ निधन झाले होते. त्यानंतर ६ महिन्यांतच त्यांचा मुलगा गजेंद्र हाही अल्पशा आजाराने मरण पावला. त्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले. घरातील दोन्ही कर्त्या पुरुषांचे निधन झाल्यामुळे या कुटुंबाची जबाबदारी सासू सुनेवर आली. मोलमजुरी केल्याशिवाय प्रपंच चालवणे शक्य नसल्याने दोघी मोलमजुरी करून आपल्या घरात असलेल्या तीन लहान मुलांना शिक्षण देत उदरनिर्वाह करत आहेत. त्यांना उदरनिर्वाहासाठी आणखी मदतीची गरज असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शंभु माने यांनी आपुलकी प्रतिष्ठानशी संपर्क साधून दिली. त्यानंतर स्थळ भेट व पाहणी करून आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने दोन पिलांची शेळी रविवारी भेट देण्यात आली तसेच त्यांच्या तीनही मुलांचा दहावी पर्यंतचा शैक्षणिक खर्चही आपुलकी प्रतिष्ठान करणार असल्याचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी सांगितले.
यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सदस्य हरिभाऊ जगताप, प्रमोद दौंडे, महादेव दिवटे, रवींद्र कदम, प्रकाश भोसले, दादा कटरे, जयंतराव टकले, अमर कुलकर्णी त्याचबरोबर सावे गावचे माजी सैनिक उद्धव सुतार, ग्रंथपाल संजय सरगर, शंभु माने, शिवाजी चव्हाण, अशोक सुतार, सिध्देशर कुंभार, बंडू गडदे, अण्णा माने, सिताराम सुतार, हसन अत्तार, विठ्ठल पारसे, भारत माने, आप्पा चव्हाण, तुकाराम माने, लक्ष्मी चव्हाण, मथुरा चव्हाण आदी उपस्थित होते.