चंद्र सूर्य असेपर्यंत बुधेहाळ तलावाचा तळ दिसणार नाही- आमदार शहाजी बापू पाटील; खासदार-आमदार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत चोपडी येथे लोकप्रतिनिधींचा गाव भेट दौरा

नाझरा(वार्ताहर):- सांगोला तालुक्यातील बुध्देहाळ तलावाच्या पाण्यासाठी या परिसरातील जनता गेली 50 वर्ष संघर्ष करीत होती. या संघर्षाला आता पूर्णविराम मिळतोय कारण टेंभू उपसा सिंचन योजनेत बुध्देहाळ तलावाचा समावेश करण्यात आला आहे.त्यामुळे चंद्र-सूर्य असेपर्यंत बुध्देहाळ तलावाचा तळ दिसणार नाही याची मी हमी देतो असे प्रतिपादन सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले.चोपडी येथे खासदार-आमदार आपल्या दारी या उपक्रम अंतर्गत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर,सांगोला तालुका भाजप अध्यक्ष चेतनसिंह केदार,युवा नेते सागर पाटील,दादासाहेब लवटे, उपसरपंच पोपट यादव,सरपंच मंगलताई सरगर,दगडू बाबर, ग्रामपंचायत सदस्य दिनकर बाबर अनिल जगदाळे, गुंडादादा खटकाळे, पोलीस निरीक्षक कुलकर्णी, विविध खात्यांचे पदाधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की या परिसरात असणाऱ्या विविध रस्त्यांच्या कामांचा प्रश्न मार्गी लागला आहे.नाझरे ते चोपडी या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर इंगोले यांना आम्ही सातत्याने समज देत आहे,आता अजून एकदा समज देऊन त्यांनी ते काम पूर्णत्वास नाही आणले तर आम्ही वेगळा निर्णय घेऊन ते काम पूर्णत्वास आणू असा शब्द दिला. यावेळी यशवंत बाबर,आर.एस.बाबर यांनी परिसरातील विविध मागण्यांबाबत आपले विचार व्यक्त केले.
मावळतिच्या सूर्याची शपथ घेऊन या भागाला पाणी आणतो म्हणणारे या भागातील माजी खासदार यांनी या भागाला आतापर्यंत कोरडेच ठेवले होते.याउलट या भागाला येणारे पाणी त्यांनी सातत्याने बारामतीला पळवले आहे. पाणी परिषदा आटपाडीला व्हायच्या सांगोल्याला व्हायच्या पाणी मात्र दुसरीकडे जायचे गाईला चारा आपण चारायचा दूध मात्र बारामतीला न्यायचं अशा या सगळ्या गोष्टींमुळे इथल्या सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत होता यासाठी प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला म्हणूनच सांगोला तालुका आज विविध योजनांमुळे प्रगतीपथावर आहे येणाऱ्या काळात आपल्या सर्वांच्या विविध अडीअडचणी आम्ही सोडवण्यास कटिबद्ध आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.