सांगोला विद्यामंदिरमध्ये प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला प्राचार्य भीमाशंकर पैलवान ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दि.३१ जानेवारी २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला यांचे वतीने संस्था सचिव म.शं. घोंगडे व सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे यांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला व यावेळी व्यासपीठावर संस्था खजिनदार शंकरराव सावंत, संस्था सदस्य दिगंबर जगताप, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभीषण माने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्था अध्यक्ष चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये दादासाहेब वाघमोडे सर, मारुती बोरकर सर,प्रा.धनाजी चव्हाण यांनी प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांच्या अमोघ कार्याविषयी आपल्या मनोगतातून कौतुक केले. अध्यक्षीय मनोगतात संस्था सचिव म.श. घोंगडे यांनी भीमाशंकर पैलवान सर एक ध्येयनिष्ठ शिक्षक होते त्यांनी गणित व विज्ञान या विषयाचे कुशल अध्यापन केले. सूत्रसंचालनामध्ये आपला ठसा उमटवला. एक अजातशत्रू व्यक्तित्व व त्यांचे प्रभावी कार्य विद्यामंदिरच्या कायम स्मरणात राहील असे सांगत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे यांनी केले उन्मेश आटपाडीकर यांनी सूत्रसंचालन केले तर पर्यवेक्षक पोपट केदार यांनी आभार प्रदर्शन केले.
माझ्या एकूण जडणघडणीमध्ये पूज्य बापूसाहेब झपके, प्रा. प्रबुद्धचंद्र झपके , झपके कुंटुबिय,माझे आई-वडील यांचा विलक्षण प्रभाव आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञतेचा भाव कायम माझ्या मनात राहील.१९९० मध्ये सांगोला विद्यामंदिर येथे शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर सुरूवातीला विज्ञान व नंतर गणित विषयाचे अध्यापन करताना गुरुवर्यांचे मौलिक मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे मी चांगले अध्यापन करू शकलो.त्यानंतर माझे आवडीचे सूत्रसंचालन हे कार्य प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर व वांगीकर सर यांचे मार्गदर्शनाखाली स्वीकारले.विद्यामंदिरमध्येच ते बहरले. त्यातूनच शरदराव पवार साहेब, विलासराव देशमुख साहेब यांच्यासह अनेक नामवंत वक्ते, विचारवंत, कवी ,लेखक यांच्या कार्यक्रमाचे निवेदन करता आले. माझ्या जीवनामध्ये वाचनाचा व्यासंग महत्त्वपूर्ण ठरला . यापुढे माझा कथाकथन छंद जोपासणे, पर्यटन तसेच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचा मानस आहे.
– प्राचार्य भीमाशंकर पैलवान