काकींच्या निधनानंतर लेकरांनी जपली परंपरा ; माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमालाताई गायकवाड यांच्याकडून पायी वारी

ह.भ.प.स्व.शारदादेवी (काकी) साळुंखे-पाटील यांची अध्यात्मिक परंपरा कायम
अध्यात्माचा सह्याद्री व भक्तिमार्गातील कळस असणाऱ्या व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील भक्ती परिवाराच्या आधारस्तंभ ह.भ.प .स्वर्गीय शारदादेवी (काकी) साळुंखे-पाटील यांनी सुरू केलेला अध्यात्माच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे कार्य त्यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष, मा.आ. दिपकआबा साळुंखे पाटील ,डॉ.प्रदीप साळुंखे -पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.जयमालाताई गायकवाड, सौ.चारुशीला काटकर, सौ.मधुमती साळुंखे पाटील व सौ.रूपमतीदेवी साळुंखे पाटील यांच्या सहकार्याने संपूर्ण साळुंखे पाटील कुटुंबियाकडून अविरतपणे याही वर्षी जवळा ते पंढरपूर माघी वारी दिंडी सोहळा सुरू ठेवल्यामुळे सबंध वारकरी संप्रदायामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ह.भ.प.शारदादेवी (काकी)साळुंखे पाटील यांच्या आकस्मित निधनाने संपूर्ण वारकरी संप्रदायावरच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर एक शोककळा पसरली होती. स्वर्गीय काकींनी चालू केलेले वारकरी संप्रदायातील कार्य त्यांच्या निधनानंतर कोण चालवणार हा प्रश्न जणू संपूर्ण वारकरी संप्रदायाला पडला होता.पण त्यांचे सुपुत्र, कन्या व संपूर्ण साळुंखे-पाटील कुटुंबीयांनी आपल्यावर असलेले दुःख बाजूला सारून काकींनी सुरू केलेले अद्वितीय व अतुलनीय कार्य चालू ठेवल्यामुळे वारकरी संप्रदायाकडून त्यांना धन्यवाद मिळत आहे.
आपल्या संपूर्ण हयातीमध्ये स्वर्गीय काकीनी विठ्ठल भक्ती, विठ्ठल जप, राम कृष्ण हरी हीच आपली बलस्थाने केंद्रस्थानी मानून “मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा” हे ब्रीद अंगीकारून स्व. काकीनी सुरू केलेले अखंड हरिनाम सप्ताह, सांगोला ते आळंदी पायी वारी, पायी सांगोला ते पंढरपूर माघी वारी दिंडी,शेकडो महिला भजनी मंडळाची स्थापना, गोरगरीब, दीनदलित लोकांना त्यांच्या गरजेनुसार मदत करण्याचे कार्य, अन्नदान करण्याचे कार्य अशा अनेक मार्गाने खऱ्या अर्थाने प्रत्येक वंचित घटकावर ‘आईच्या मायेची पाखर’ असलेल्या काकी यांचे कार्य अविरतपणे चालू ठेवण्याचा निर्धार त्यांच्या संपूर्ण साळुंखे पाटील कुटुंबीयांनी घेतल्याने संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून समाजाच्या सर्व स्तरावर त्यांचे कौतुक होत आहे.