सांगोल्यातील जनावरांचा बाजार लवकरात लवकर सुरु करावा- डॉ.बाबासाहेब देशमुख

कोळा वार्ताहर :- गेल्या काही महिन्यांपासून लंपी आजाराचा कहर सुरु होता. मात्र आता या आजारावर प्रशासनाला आणि सरकारला नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव आता खूपच कमी झाला असल्याने तसेच लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात केले गेल्यामुळे बंद असलेला सांगोल्यातील जनावरांचा बाजार लवकरात लवकर सुरु करावा अशी मागणी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेकापचे युवा नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.
सांगोला येथील जनावरांचा आठवडा बाजार लंपी स्किन आजारामुळे बंद आहे. सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागासह अनेक परजिल्ह्यातील शेतकरी बांधव, व्यापारी बांधव डॉ.बाबासाहेब देशमुख यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या अडचणी समस्या सांगत असून सांगोल्याचा जनावरांचा आठवडा बाजार लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी करत आहेत.
या आजाराचा प्रसार वेगाने होत असल्याने जनवारांच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार थंडावले आहेत. काही ठिकाणी घरगुती स्तरावर जनावरांची खरेदी-विक्री होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा आठवडा बाजार बंद असल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे छोटे-मोठे व्यापारी व शेतकर्यांची उपासमार होवू लागली आहे. लम्पी स्कीन आजाराचे प्रमाण आटोक्यात आल्याने आणि बहुतांश जनावरांना लसीकरण झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिध्द असणार्या सांगोल्यातील जनावरांच्या बाजाराला परवानगी देण्यात यावी. अशी मागणी जिल्हाधिकारी यांचेकडे करणार असल्याचे डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.