महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे सांगोला येथे शिवजन्मोत्सव साजरा
छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्मनिती, राजनीती, आचरणनीती सारख्या अनेक गोष्टी शिकविल्या - पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी

सांगोला, तालुका प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मनिती, राजनीती, आचरणनीती सारख्या अनेक गोष्टी शिकविल्या. जयंती उत्सव साजरा करताना महाराजांचा एखादा तरी गुण अंगीकारावा असे आवाहन सांगोल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे सांगोला येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले की, ‘जनतेच्या प्रती नेहमी जागृत असणारा राजा म्हणून महाराजांची ओळख होती. राजांवर जिजाऊ मॉंसाहेबांचे संस्कार झाल्यामुळे शिवाजी महाराज महाराष्ट्रात सुराज्य निर्माण करू शकले व छत्रपती झाले. आज प्रत्येक घरात शिवाजी जन्माला यायचा असेल तर जिजाऊ सारखी शिकवण मिळाली पाहिजे. फक्त छत्रपती डोक्यावर घेऊन नाचले म्हणजे शिवजयंती साजरी झाली असे नाहीतर महाराज डोक्यातही गेले पाहिजेत. शिवजयंती साजरी करताना प्रत्येकाने महाराजांचा एखादा जरी गुण अंगीकारला तर ती जयंती सत्कारणी लागेल असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, मोहन मस्के, दत्तात्रय खंडागळे, विठ्ठल देशपांडे, मिनाज खतीब, किशोर म्हमाणे, आनंद दौंडे, अमेय मस्के, दीपक भाकरे, प्रवीण घोंगडे, विनायक मस्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय खंडागळे यांनी तर आभार विठ्ठल देशपांडे यांनी मानले.