चाकूचा धाक दाखवून घेरडी येथे 2 लाख 16 हजार रुपयांची लूट

सांगोला(प्रतिनिधी):- अनोळखी 4 व्यक्तींनी स्कार्पिओ मधून येऊन पेट्रोल पंपावरील कर्मचार्यास चाकूचा धाक दाखवून पंपावरील ऑफिसरूम मधील लॉकरमध्ये ठेवलेले 2 लाख 16 हजार 88 रुपये जबरदस्तीने घेऊन गेल्याची घटना घेरडी ते वाणीचिंचाळे रस्त्यावरील घेरडी (ता. सांगोला) येथील पेट्रोल पंपावर 21 फेब्रुवारी रोजी रात्री 2 च्या सुमारास घडली आहे.
पेट्रोल पंपावरील कर्मचारी असलेला हर्षद सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हर्षद सोनवणे व चैतन्य सरगर हे रात्र पाळीच्या शिफ्टमध्ये पेट्रोल पंपावर काम करीत होते. 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता फिर्यादी व चैतन्य सरगर घेरडी पेट्रोल पंपावर नेहमीप्रमाणे कामावर आले. त्यावेळी रोहन जगदाळे व योगेश कांबळे यांनी दिवसभर पेट्रोल विक्रीचे जमा झालेले 2 लाख 1 हजार रुपये फिर्यादीच्या ताब्यात दिले. ती रक्कम त्यांनी मोजून पेट्रोल पंपाच्या ऑफिस रूममधील लॉकरमध्ये ठेवले. त्यानंतर फिर्यादी व चैतन्य सरगर यांनी पेट्रोल पंपावर वाहनांचे तेल सोडून रात्री 11.30 च्या सुमारास 15 हजार रुपयांची रक्कमही ऑफिस लॉकरमध्ये ठेवून ते झोपी गेले. दिनांक 21 फेब्रुवारी रोजी रात्री 2 च्या सुमारास हे कर्मचारी झोपलेले असताना स्कार्पिओ जीप मधून अनोळखी चार जण कान, टोपी व तोंडाला रुमाल बांधलेले पेट्रोल पंपावर आले. त्यांनी आम्हास पेट्रोल हवे असे सांगून कर्मचार्यास झोपेतून उठवले. बाहेर आल्यानंतर कर्मचार्यास चाकूचा धाक दाखवून पंपावरील ऑफिस रुममधील लॉकरमध्ये ठेवलेले दोन लाख 16 हजार 88 रुपये जबरदस्तीने घेऊन गेल्याची फिर्याद सांगोला पोलिसात नोंद केली आहे.