उत्कर्ष विद्यालयाचा विद्यार्थी भविष्यात एक आदर्श व्यक्ती म्हणून घडेल-प्रा. डॉ. शालिनीताई कुलकर्णी.

विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावीची परीक्षा ही शालेय जीवनात महत्त्वाची असते. शैक्षणिक विकासाचा हा महत्त्वाचा टप्पा व महत्त्वाचे वर्ष असते. विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना न घाबरता जिद्दीने व चिकाटीने त्याला सामोरे गेले पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन वाढवले पाहिजे. असे मत इयत्ता दहावीच्या शुभेच्छा समारंभात बोलताना प्रा. डॉ.शालिनीताई कुलकर्णी यांनी मांडले.
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2022 -23 मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभात त्या बोलत होत्या. त्यावेळेस व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्षा डॉक्टर संजीवनी ताई केळकर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्रीयुत सुनील कुलकर्णी सर ,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मागाडे बाई उपस्थित होत्या.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सौ .भोसले मॅडम यांनी प्रास्ताविकातून इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमाची सुरुवात कशी झाली, वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांची घटक निहाय चाचण्या घेऊन विद्यार्थ्यांची तयारी कशी करून घेतली हे सांगितले. विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांनी लेखी परीक्षेच्या संदर्भातील नियम सूचना विद्यार्थ्यांना देत परीक्षेसंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळेस प्रशालेतील शिक्षक श्रीयुत संचित राऊत सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना कर्तुत्वाचे वेरूळ घडवण्याचे तसेच आपले उत्कर्ष विद्यालय कायम स्मरणात ठेवण्याचे आवाहन केले. तसेच सर्वगोड बाई यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
तर विद्यार्थ्यांपैकी प्रतीक्षा फुले, शाहिद मुजावर मधुरा पैलवान, रोहित नवले, प्रांजली ढाकणे, गंगामाई खांडेकर, सोहाली मणेरी, अनुष्का सुतकर, सृष्टी कदम या विद्यार्थ्यांनी शाळेविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करत दहा वर्षातील आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
वरील कार्यक्रमात संस्था अध्यक्षा मा.डॉ. संजीवनी ताई केळकर व इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाला माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्रीयुत मिसाळ सर यांनी केले. तर आभार श्री संचित राऊत सर यांनी मानले.