उत्कर्ष विद्यालयात राज्यस्तरीय श्रीभगवद्गीता स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) पंढरपूर द्वारे सांगोला तालुक्यातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यामध्ये उत्कर्ष विद्यालयातील 91 विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी झालेले होते .या प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता आठवी ते दहावी गटातून उत्कर्ष विद्यालयातील प्रथम तीन क्रमांकाचे विजेतेपद विद्यार्थ्यांनी पटकावले या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा विद्यालयांमध्ये आयोजित केलेला होता. त्यावेळेला व्यासपीठावर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मागाडे मॅडम ,उपमुख्याध्यापिका स्वरालीताई, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर ,पर्यवेक्षक मिसाळ सर, भोसले सर उपस्थित होते.
मुलांना भगवद्गीतेचे महत्त्व समजावे विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होऊन मन एकाग्र व्हावे व गुणवत्ता वाढावी यासाठी राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केलेले होते यामध्ये एकूण 32 शाळांनी सहभाग घेतलेला होता. त्या 32 शाळांमधून कुमारी गायत्री उल्हास कचरे हिचा शाळेमधून प्रथम क्रमांक व तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे, तर मृदुला रवींद्र कुलकर्णी हिचा शाळेतून द्वितीय क्रमांक तालुक्यात तृतीय व रेणुका सोमनाथ दिवटे शाळेतून तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. या कार्यक्रमांमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून भगवद्गीता अभ्यास करताना आलेले अनुभव व त्यांच्यामध्ये झालेला बदल हे कथन केले.
प्रशालेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सरांनी परीक्षेपुरते ज्ञान न मिळवता दैनंदिन जीवनामध्ये भगवद्गीतेतील श्लोकांचे अर्थासह पाठांतर करून त्या श्लोकांचा व्यवहारामध्ये उपयोग करावा व सुट्टीमध्ये भगवद्गीता वाचावी हा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्कृत विभाग प्रमुख रेखा भिंगार्डे मॅडम व शुभांगी कवठेकर यांचे मार्गदर्शन लाभले.