नाझरे परिसरात गरिबाच्या फ्रिजची मागणी वाढली

नाझरे (प्रतिनिधी):-सध्या नाझरे व परिसरात कडक उन्हाने अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे त्यामुळे आठवडा बाजारावर ही परिणाम झाला असून रखरखत्या उन्हात घशाला कोरड पडत असल्याने येथील नागरिकांची गरीबाच्या फ्रिजची मागणी वाढत असून, लोक माठ (डेरा) मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
शिमगा संपला की उन्हाचा तडाखा सुरू होतो व दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने घशाची कोरड थांबवण्यासाठी सर्वसामान्य नागरिक थंड पाणी पिण्यासाठी माठांचा वापर करीत आहेत. त्यामुळे नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन कुंभार वाड्यात डेरे तयार करण्यावर जास्तीत जास्त भर देत असल्याचे दिसत आहे. उन्हाळ्याच्या या दिवसात गारवा मिळावा म्हणून विविध कंपन्यांचे फ्रिज सध्या उपलब्ध असून त्याच्या किंमती गोरगरीब नागरिकांना परवडणार्या नाहीत त्यामुळे कुटुंबाला गार पाणी मिळावे व तहान भागावी म्हणून गरीबाचा फ्रिज म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेर्याची मागणी वाढली आहे.
आमच्या कुटुंबाचा हा पिढ्यानपिढ्या कुंभार कामाचा व्यवसाय आहेत. यातूनच उदरनिर्वाह करायचा म्हणून मी व माझी मंडळी, मुलगा, सून गेली 5 महिने झाले माठ तयार करीत आहोत.फ्रिजचे थंड पाणी पिण्याऐवजी नैसर्गिकरित्या गार पाणी पिण्यासाठी नागरिक माठांना पसंती देत आहेत. सध्या तरी गरिबांची फ्रिज म्हणून प्रसिद्ध असलेल्या माठाला मागणी वाढली आहे
सुधाकर कुंभार