देशात जाती-धर्माचे विष पेरण्याचे पाप भाजपाने केले : मेहबूब शेख; शरद युवा संवाद यात्रेतून मेहबूब शेख यांचे भाजपा आणि मोदींवर टीकास्त्र

जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान आणि सुसंस्कृत देश अशी ओळख असलेल्या आपल्या मातेसम देशात भारतीय जनता पार्टीने सत्ता मिळविण्यासाठी मीडिया आणि सोशल मीडियाचा गैरवापर करून जाती धर्माचे विष पेरण्याचे पाप केले असल्याचा घनाघाती आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला. सांगोला येथील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित शरद युवा संवाद यात्रेतून ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील युवकचे राकेश कामठे अरुण आसबे, गणेश पाटील मधुकर बनसोडे चंद्रकांत शिंदे तानाजी पाटील तालुकाध्यक्ष अनिल खटकाळे रवी चौगुले सचिन लोखंडे अमोल सुरवसे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले, सध्या देशात आणि राज्यात सत्तेवर असलेला भारतीय जनता पार्टी हा सर्वात खोटारडा राजकीय पक्ष आहे जातीच्या धर्माच्या नावावरून समाजात तेढ निर्माण करून हा पक्ष फक्त आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम करतो. केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी आणि शहा यांनी धर्माधर्मात वितुष्ट निर्माण करण्यासाठी ओवैसी सारखे लोक पाळले आहेत. जर तुम्ही खरोखर हिंदुत्ववादी असाल तर सतत समाजविघातक वक्तव्य करून सामाजिक शांतता भंग करण्यासाठी गरळ ओकणाऱ्या ओवेसी बंधूवर तुम्ही कारवाई का करत नाही..? असा सवालही यावेळी शेख यांनी उपस्थित केला. कृषीप्रधान देश अशी ओळख असलेल्या आपल्या देशात खरोखरच बळीराजाचे राज्य आणायचे असेल तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी लावून काम करण्याची वेळ आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्रजी पवार यांचे विचार गावोगावी घरोघरी पोहोचवून आगामी निवडणुकीत या देश विकायला काढणाऱ्या टोळीला आपण रोखले पाहिजे असेही शेवटी मेहबूब शेख म्हणाले.
यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, आजपर्यंत पक्षाने दिलेला आदेश प्रमाण मानून आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी लावून पक्षाचा प्रसार आणि प्रचार खेडोपाडी घरोघरी केला आहे. पूर्वीपासून खा.शरदचंद्र पवार यांचे सांगोला तालुक्यावर विशेष प्रेम राहिले आहे आणि सांगोलकरांनीही नेहमीच तितक्याच ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका घेतली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्याची प्रचिती आली आहे. यापुढील काळातही आम्ही जिद्दीने आणि संपूर्ण ताकदीनिशी खा. शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी उभा राहू असा निर्धार शेवटी दिपकआबांनी व्यक्त केला.
चौकट ;
आम्ही केवळ एक पक्ष नाही तर कुटुंब आहोत..!
स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आणि स्व. ह.भ. प. शारदादेवी साळुंखे पाटील (काकी) यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आम्ही सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा निव्वळ राजकीय पक्ष म्हणून काम करत नाही तर हे संपूर्ण आपले कुटुंब आहे या कुटुंबातील प्रत्येकाची सुख-दुःखे ही आपली आहेत याच भावनेतून काम करत आहोत. स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्यापासून आपण हा वारसा जपला आहे. यापुढील काळातही एक कुटुंबातील सदस्य याप्रमाणेच पक्षातील कार्यकर्त्यांची नेहमी काळजी घेत असतो आणि कार्यकर्ताही त्याच जीवाभावाने आपल्या सोबत राहतो.
मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील
एम.आय.एम. म्हणजे मोदी इम्पोर्ट मेंबर
केवळ जाती धर्मात विष कालवून सामाजिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने स्थापन झाला आहे. एम आय एम हा राजकीय पक्ष नव्हे तर ते ओवैसी बंधू मोदी इम्पोर्ट मेंबर आहेत अशी बोचरी टीकाही यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली.