राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्याच्या दुसऱ्या दिवशी सांगोलाकराना मिळाली सुसंस्कार आणि ज्ञानाची मेजवानी.

सांगोला:- संत साहित्य हे आतापर्यंत समाजाला दिशा देण्यासाठी मार्गदर्शन ठरीत आहे. संत साहित्याने समाजाला बदलले. शरीरात होणारा बदल नको, मनात बदल झाला पाहिजे, त्यातून समाजमनात बदल होत असतो. समाजमनातील लोकांना विकास करायचा असेल तर संत साहित्याचा अभ्यास केला पाहिजे. संत साहित्याने जगातील पाप म्हणजे संशयाच्या गाठी दूर केल्या, समाजातील स्पृश्य अस्पृश्यचा विटाळ दूर करण्याचे महान कार्य फक्त संत साहित्याने केले. संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चांगदेव, संत चोखोबा यांनी आपल्या वागण्यातून आणि आधुनिक काळातील महापुरुषांनी संत साहित्याचा विचार समाजात रुजविला. त्यामुळे संत साहित्य हे आधुनिक काळातील समाजासाठी प्रेरणा देत आहे. आपले जगणे हेच संत साहित्याचा अविभाज्य घटक बनले आहे. म्हणून संत साहित्याचा अभ्यास केला पाहिजे, संत साहित्याला विसरून चालणार नाही, असे मत ह.भ. प. जयवंत महाराज बोधले यांनी व्यक्त केले.
सांगोला येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात संत साहित्य आणि समाज परिवर्तन या परीसंवादात व्यक्त केले.या वेळी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ. प. श्यामसुंदर सोन्नर महाराज, ह. भ. प. देवदत्त परुळेकर महाराज, ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, आणि संवादक अडवोकेट गजानन भाकरे उपस्थित होते.
या वेळी श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी आपले विचार व्यक्त करताना संत साहित्य आणि आजच्या आधुनिक काळातील संताचे विचार किती मार्गदर्शन केले. मराठी भाषा हि संत साहित्यामुळे किती समृद्ध झाली आहे. आणि त्या भाषेत किती ताकद आहे हे विविध मुद्याद्वारे पटवून दिले. तर ह.भ.प.देवदत्त परुळेकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत समाजातील प्रगती संत साहित्यातून कशी समृद्ध होत गेली हे पटवून दिले.
तर साहित्य संमेलन व समाज परिवर्तन यामध्ये प्रसिध्द पत्रकार सचिन परब यांनी आपल्या मनोगतातून जिथे संत नामाचा विचार होतो, तिथे समाजाची प्रगती शक्य आहे. संताच्या विचाराने हि भूमी घडली आहे. खरा धर्म म्हणजे सेवाधर्म होय, सेवाधर्माचे मूळ हे संत साहित्यात आढळते. संत परंपरा महान आहे. सामाजिक परिवर्तन हे संत साहित्यातुन होत आहे. आधुनिक समाजसुधारकांनी सुद्धा संत साहित्यातून सामाजिक परिवर्तन शक्य आहे, हे ओळखून उत्कृष्ठ सामाजिक कार्य केले असल्याचा सुर या परीसंवादातून व्यक्त केला.
साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रात कथाकथन पार पडले. प्रसिध्द कथाकार आप्पासाहेब खोत यांनी “मरणादारी” हि कौटुंबिक कथा सादर करुन उपस्थितांना भावनिक केले. तर ज्योतिराम फडतरे यांनी “शाळा तपासणी”हि विनोदी कथा सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली.
या वेळी सांगोलाचे सुपुत्र आणि लेखक डॉ. कृष्णा इंगोले यांची मुलाखत घेण्यात आली. आपल्या प्रकट मुलाखतीतून त्यांनी आपण लेखक कसा घडलो, हे सांगितले. सांगोलासारख्या दुष्काळी भागात माणदेशी साहित्य कसे लिहीत गेलो, हे उलगुढून सांगितले. दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमास सांगोला शहर आणि तालुक्यातील साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थिती दर्शविली.