सांगोला तालुका

मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा – शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना. दीपक केसरकर; सांगोल्यातील राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाची सांगता

मराठी साहित्य जसे फुलत गेले पाहिजे तशी मराठी भाषा सुध्दा टिकली पाहिजे. मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. त्यांच्या पाठीशी शासन नेहमीच राहील, अशी ग्वाही शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री ना. दीपक केसरकर यांनी आज दिली.

सांगोला येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. ग. दि. माडगुळकर साहित्य नगरी, सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे आयोजित या कार्यक्रमास स्वागताध्यक्ष संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव, आ. शहाजीबापू पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिवाजीराव काळुंगे, भाऊसाहेब रुपनर, रफिक नदाफ आदि उपस्थित होते.
माणदेशातील माणसे ताठ मानेने जगणारी असल्यामुळे या परिसराला माणदेश नाव पडले आहे, असे सांगत स्वागताध्यक्ष आ.शहाजीबापू पाटील म्हणाले, सर्वाधिक शक्ती भाषेमध्ये असून आवाजात बदल झाला तरी भाषेत बदल होतो, ही भाषेची ताकद आहे. मराठी भाषा आपल्या आई समान असून यापुढील काळात मराठी भाषा मजबूत झाली पाहिजे. मराठी भाषेची आवड प्रत्येक तरुणाला झाली पाहिजे. त्याचप्रमाणे विचाराचे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी संमेलन सुरु केले आहे. सांगोल्यात एक यशस्वी साहित्य संमेलन पार पडले असून यापुढील 3 ते 4 वर्षात हे संमेलन समुद्रासारखे पसरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव म्हणाले, सांगोल्यातील साहित्य संमेलनात एकापेक्षा एक सुंदर कार्यक्रम संपन्न झाले.. सांगोल्यातील साहित्याची चळवळ यापुढील काळात अशीच मोठी होत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या मुलांनी आत्महत्त्या करु नये ही कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रा. प्रबुध्दचंद्र झपके, गौरवमुर्ती योगीराज वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. द. ता. भोसले, योगिराज वाघमारे, भास्कर चंदनशिवे, डॉ. कृष्णा इंगोले या गौरवमुर्तीना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सूत्रसंचालन भीमाशंकर पैलवान यांनी तर आभार अ‍ॅड. उदय घोंगडे यांनी मानले.

मंत्री ना. दीपक केसरकर यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांचे कौतुक
यावेळी शालेय शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे कौतुक केले. श्री.स्वामी यांनी चांगले उपक्रम सोलापूर जिल्ह्यामध्ये राबविलेले आहेत. आदर्श शिक्षण कसे असावे यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. अशा पध्दतीचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात झाले पाहिजेत, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!