डॉ.कृष्णा इंगोले यांच्या प्रकट मुलाखतीत माणदेश जिल्हयाची मागणी

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला, मंगळवेढा,आटपाडी,जत, माण दहिवडी या तालुक्यांना न्याय मिळण्यासाठी सोलापूर,सातारा व सांगली जिल्ह्यातील काहीं भाग एकत्र जोडून नवा माणदेश जिल्हा व्हावा अशी मागणी डॉ.कृष्णा इंगोले यांनी सांगोला येथील राज्यस्तरीय साहित्य संमेलनात केली. या प्रकट मुलाखतीचे प्रश्न आटपाडी येथील सुभाष कवडे, ॲड गाजनान भाकरे यांनी विचारले.सदर मुलाखतीत एकूण अकरा प्रश्न विचारण्यात आले.त्यावेळी माणदेश – स्वरूप आणि विकास या इंगोले यांच्या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ.इंगोले बोलत होते. कृष्णराव खाडे यांच्या अभ्यासावर आधारित अहवाल १९८५ ते १९८८ या दरम्यान माणदेश जिल्हा निर्मिती व्हावी याविषयीचा अहवाल शासनाकडे सादर केला होता.मात्र राजकीय इच्छशक्तीचा अभाव जाणवल्या ने हा प्रश्न मार्गी लागला नाही,अशी खंत डॉ.इंगोले यांनी यावेळी व्यक्त केली.रोजगार निर्मिती व औद्योगिक क्षेत्राचा अभाव यां दोन समस्ये मुळे सांगोला माणदेश विकासाच्या बाबतीत मागे असल्याचे मत इंगोले यांनी नोंदविले.उपलब्ध पाणी शेतात गेले पाहिजे व कारखानदारी वाढली तर माणदेश विकसित होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सदर मुलाखतीतून डॉ.इंगोले यांच्या प्रदीर्घ साहित्य कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.सराचे बालपण, शिक्षण, कौटुंबिक परिस्थिती,प्राध्यापक म्हणून केलेल्या सेवेतील अनुभव,शासन व समाजाची मराठी भाषेविषयी अनास्था या प्रश्नावर डॉ.इंगोले यांनी विस्तृत विवेचंनकेले.
यावेळी डॉ.इंगोले यांच्या तुका म्हणे या ग्रंथावर आधारित साहित्यिक मुल्यावर विवेचन करण्यात आले.मराठी युवकांना अनेक संधी असून प्रयत्न व अभ्यासाच्या जोरावर त्यांनी प्रगती करावी,अशी अपेक्षा इंगोले यांनी व्यक्त केली.
या प्रकट मुलाखतीतून डॉ.इंगोले यांचा समग्र साहित्यिक प्रवास, माणदेशातील समस्या, लोकसंस्कृती, स्त्रियांचे प्रश्न,अभ्यासक्रम व शिक्षण, सरांचे काव्यलेखन यासह अनेक विषयावर प्रकाश टाकण्यात आला. एकूण अकरा प्रश्नाच्या माध्यमातून सराचे साहित्य व माणदेश या विषयी उपयुक्त माहिती उपस्थितांना मिळाली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.धनाजी चव्हाण व सुनील जवंजाळ यांनी केले.आभार प्रदर्शन डॉ.यशपाल खेडकर यांनी केले. सदर कार्यक्रमास संमेलनाध्यक्ष इंद्रजित भालेराव व साहित्यिक व साहित्य रसिकव राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन नियोजन समिती अध्यक्ष बाबुराव गायकवाड, कार्याध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, सचिव दादासाहेब लोंढे, सहसचिव ॲड उदय घोंगडे यांच्यासह अनेक साहित्यिक व मान्यवर उस्थितीत होते.