दुष्काळी तालुक्यांतर्गत मिळणारी प्रत्येक सवलत प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पूर्ण वेळ काम करणार- आमदार शहाजीबापू पाटील

महूद, ता. १ : चालू वर्षीच्या खरीप हंगामात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला,बार्शी माळशिरस या तीन तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा तर करमाळा व माढा या तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सवलतींची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा देणार असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने आज मंगळवारी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. सन २०२३ च्या खरीप हंगामाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळ देखरेख समितीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे राज्यातील १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्यमानाची तूट, उपलब्ध भूजलाची कमतरता,पेरणी खालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्वांचा एकत्रित विचार करून या ४० प्रभावित तालुक्यातील आपत्ती विचारात घेऊन दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या या ४० तालुक्यांसाठी जमीन महसुलात सूट,पीक कर्जाचे पुनर्गठन,शेतीशी निगडित कर्ज वसुली स्थगिती,कृषी पंपांचे चालू बिलात ३३.५ टक्के सूट, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता,पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर चा वापर, शेती पंपांची वीज जोडणी खंडित न करणे अशा प्रकारच्या सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेल्या कृषी विषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुज्ञेय आहे. कोरडवाहू पिकासाठी ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या खातेदारांना प्रत्यक्ष पीक पेरक्षेत्रा साठी अनुदान दिले जाईल.फळ पिके व बागायती पिकांचा पंचनामा करून हे अनुदान दिले जाईल. शाळांमध्ये दीर्घ सुट्टीच्या कालावधीतही मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येईल.एकात्मिक बाल विकास व माध्यान्ह भोजन योजने अंतर्गत मुलांना पौष्टिक अन्न देण्यात येईल.
चौकट- चालू वर्षाच्या खरीप हंगामामध्ये सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी पाऊस सांगोला तालुक्यात पडला आहे. याबाबत गेल्या दोन महिन्यापासून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जातो आहे.मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी याची दखल घेऊन गंभीर दुष्काळी तालुक्याचे यादीमध्ये सांगोल्याचा समावेश केला आहे. दुष्काळी तालुक्यांतर्गत मिळणारी प्रत्येक सवलत प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पूर्ण वेळ काम करणार आहे. पुढील सहा महिने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करत राहीन. शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या सवलती बाबत जे अधिकारी नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्नशील राहील.- आमदार शहाजी पाटील,सांगोला