सांगोला तालुकामहाराष्ट्र

भूमि अभिलेख कडील भूमापक योगेश पाटीलची बदली व विभागीय चौकशीचे आदेश

सांगोला(प्रतिनिधी) : दाम करी काम या उक्तीप्रमाणे मोजणीच्या कामात हजारो रुपयांची रक्कम स्विकारुन पैसे देणार्‍याच्या बाजूने झुकते माप टाकून त्यांना हवी तशी मोजणी करुन देणारा व पैसे न देणार्‍याचे नुकसान करुन वादविवाद आणि भांडणास कारणीभूत ठरणारा तसेच स्वत:ला अधिकार नसताना नकाशात फेरबदल करुन बोगस नकाशे बनवून देणारा सांगोला भूमि अभिलेख (सिटी सर्व्हे) कार्यालयातील भ्रष्ट व उध्दट परिरक्षण भूमापक योगेश पाटील यास निलंबीत करुन त्याची खातेनिहाय विभागीय चौकशी करणेबाबत पत्रकार हमीदभाई इनामदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मा.उपसंचालक,भूमि अभिलेख,पुणे यांनी भूमापक योगेश पाटील याची तात्काळ आजरा (जि.कोल्हापूर) येथे प्रतिनियुक्तीवर बदली केली असून त्याचेविरुध्द विभागीय चौकशीचे आदेशही दिले असल्याने सांगोला शहरातील मिळकतधारकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

मिळकतपत्रिकेवर खरेदी दस्ताची नोंद, वारस नोंद व बँक बोजाची नोंद करण्यासाठी नागरिकांनी रितसर अर्ज दिल्यानंतरही सदर नोंदी मंजूर करण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करुन त्यांना हेलपाटे घालायला लावायचे आणि शेवटी, या नोंदी धरण्यासाठी हजारो रुपयांची मागणी करायची. जो पैसे देईल त्याचेच काम, नाहीतर सहा महिने थांब अशी अनेकांना तंबी देवून व अरेरावीची भाषा वापरुन सांगोला भूमि अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक योगेश पाटील हा आर्थिक हव्यासापोटी मिळकतधारकांची अवहेलना करत त्यांचेशी नेहमीच उध्दट वर्तणूक करत होता.तसेच मोजणीच्या कामात तर,या भूमापक पाटील याने इतका गोंधळ घातला होता की, मोजणीची मागणी करणार्‍या अर्जदाराकडून वारेमाप पैसे मिळाल्याने मॅनेज होवून लगतच्या सर्व सहधारकांना नोटीसा न काढता व त्यांना हरकतीची संधी न देता, फक्त अर्जदाराला सामील असणार्‍यांनाच नोटीसा काढून मोजणी दिवशी कार्यालयात बसूनच पैसे देणार्‍या अर्जदाराकडे झुकते माप टाकून, त्याला हवी तशी मोजणी करुन चुकीच्या मोजमापांसह बोगस नकाशे तयार करुन देणे व शेजारचे लगतधारक हजर नसताना जागेवर गुपचुपपणे जावून हद्दीखूणा फिक्स करणे, असा प्रकार भूमापक योगेश पाटील याचेकडून सर्रास चालू होता.

आपल्या शासकिय कर्तव्यात कसूर करुन आर्थिक हव्यासापोटी चुकीच्या मार्गाने कामे करणारा,चुकीच्या मोजणी करुन आपापसात भांडणे लावणारा,सर्वसामान्य मिळकत धारकांशी अरेरावी करुन त्यांचेशी उध्दट वर्तणूक करणारा भ्रष्ट भूमापक योगेश पाटील अखेर विभागीय चौकशीच्या फेर्‍यात अडकला असून त्याची कोल्हापूर जिल्ह्यात बदली करण्यात आल्याने त्याच्यामुळे त्रासून गेलेल्या सांगोला शहरातील मिळकत धारकांनी भूमि अभिलेख विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!