जळीतग्रस्त साळुंखे कुटुंबियांना आपुलकी प्रतिष्ठानकडून मदतीचा हात

सांगोला (प्रतिनिधी )- राहती घरे जळून खाक झाल्यामुळे उघड्यावर आलेल्या धुमाळ वस्ती येथील साळुंखे कुटुंबियांना आपुलकी प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात दिला आहे.
धुमाळ वस्ती येथील रहिवासी असलेले श्री. संभाजी मसु साळुंखे व त्यांची मुले संजय व विजय साळुंखे यांच्या राहत्या घरी आग लागून त्यांची घरे पूर्णपणे जळून खाक झाली. साळुंखे कुटुंबीय दररोज रोजंदारीवर जातात. अतिशय गरीब असलेल्या या कुटुंबातील लोक हे गुरुवारी नेहमीप्रमाणे रोजंदारीने कामाला गेले होते, यावेळी अचानक घराला आग लागल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या आगीमध्ये घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्यामुळे तीनही कुटुंबे उघड्यावर आल्याचे समजल्यानंतर आपुलकी प्रतिष्ठानकडून त्यांना टॉवेल, चादर, सतरंजी, लहान मुलांना कपडे तसेच १ महिना पुरेल असा सर्व किराणा माल देऊन आपुलकी जोपासली आहे.
यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, प्रभाकर सरगर, प्रमोद दौंडे, इंजि. विकास देशपांडे, उमेश चांडोले, सुनिल मारडे, अमर कुलकर्णी, शरद कोळवले आदिसह सामाजिक कार्यकर्ते रमेश साळुंखे, व संभाजी साळुंखे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.