विद्यार्थी घडण्यासाठी स्पर्धेस पूरक वातावरण असणारी शाळा-विद्यामंदिर : पो.नि.अनंत कुलकर्णी; विद्यामंदिर परिवाराचे तब्बल 90 विद्यार्थी एन एम एम एस व सारथी शिष्यवृत्ती पात्र

सांगोला (वार्ताहर) विद्यार्थी यशाचा आलेख नेहमी उंचावत ठेवणारी शाळा म्हणजेच सांगोला विद्यामंदिर. झपके कुटुंबीयांच्या तीन पिढ्यांनी जोपासलेले हे शैक्षणिक रोपटे आज वटवृक्ष म्हणून कित्येकांना सावली देत आहे. याकरिता सांगोला तालुका तुमच्या कायम ऋणात राहील असे उद्गार सांगोला पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी साहेब यांनी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सांगोला,नाझरा व कोळा विद्यामंदिरमधून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.पुढे बोलताना जीवनाच्या विविध क्षेत्रात प्रभावी कामगिरी करण्यासाठी यशस्वी पायाभरणी करणाऱ्या या शाळेत शिक्षण घेताना अपयशानं खचून न जाता प्रयत्न करत रहा यश तुमचेच आहे असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, म.शं.घोंगडे, ल.आ.जांगळे, अ.ल.गायकवाड, ना.म.विसापूरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी संस्थेने जात-धर्म,पक्ष-पार्टी याचा विचार न करता फक्त गुणवत्तेच्या जोरावर भरती केलेल्या शिक्षकांच्या कष्टातून हे विद्यार्थी घडत असल्याचा सार्थ अभिमान वाटत असल्याची भावना व्यक्त केली.यावेळी प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याला संस्थेकडून रुपये पाचशेचे पारितोषिक ही त्यांनी जाहीर केले.
यावेळी सांगोला विद्यामंदिर मधील एन एम एम एस शिष्यवृत्तीधारक 32 व सारथी शिष्यवृत्तीधारक 32, नाझरा विद्यामंदिर मधील एन एम एम एस शिष्यवृत्तीधारक 12 व सारथी शिष्यवृत्तीधारक 6, कोळा विद्यामंदिर मधील एन एम एम एस शिष्यवृत्तीधारक 7 व सारथी शिष्यवृत्तीधारक 1 अशा तब्बल 90 विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मान करण्यात आला. या विद्यार्थ्यांना पुढील चार ते पाच वर्षात एकूण रुपये 45 लक्ष 19 हजार 200 एवढी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य लक्ष्मण जांगळे यांनी विद्यामंदिर परिवारातील सर्वच शाखांमध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,कार्यवाही व त्यातून मिळणारे यश याबद्दल माहिती सांगितली.
शाळेने घेतलेले मार्गदर्शन वर्ग व प्रश्नपत्रिकांचा सराव यामुळेच गुणवत्ता प्राप्त करू शकले असे उद्गार विद्यार्थी मनोगतातून कुमारी ज्ञानेश्वरी जगताप हिने तर शिक्षकांचे परिश्रम व अचूक नियोजन यातून विद्यार्थी घडले असे उद्गार सौ.अनुराधा घाडगे व यशवंत गडदे यांनी पालक मनोगता वेळी काढले.
यावेळी मार्गदर्शन करणाऱ्या सांगोला,नाझरा व कोळा येथील शिक्षक, विभागप्रमुख, शाखा बाह्यपरीक्षा विभागप्रमुख व संस्थाबाह्यपरीक्षा विभागप्रमुख या सर्वांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव कोठावळे व प्रशांत रायचुरे यांनी तर आभार उपप्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी मानले. कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थी पालक व शिक्षकांना अल्पोपहार व चहापान करण्यात आले.याप्रसंगी पर्यवेक्षक अजय बारबोले,पोपट केदार,बिभीषण माने यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.