सांगोला विद्यामंदिर मध्ये वासंतिक वर्गाचे दिमाखदार उद्घाटन

सांगोला (वार्ताहर) सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये इयत्ता पाचवी वासंतिक वर्गाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न झाले. यावेळी कार्टून व्यक्तिरेखांमधील डोरेमोन व पतलू त्याचप्रमाणे सेल्फी पॉईंट, बलून डेकोरेशन या विविध उपक्रमांचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी पहिला दिवस मजेत घालवला. संस्कारक्षम परिपाठावेळी विद्यार्थ्यांनी गुरुस्तवन, गणपती स्तोत्र, शारदास्तवन म्हटले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात कै. गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके, सावित्रीबाई फुले व देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस विद्यार्थी व पालक यांचे हस्ते पुष्पहार समर्पण व पूजनाने झाली. प्रास्ताविकात पर्यवेक्षक अजय बारबोले यांनी विद्यार्थी व पालक यांचे स्वागत करून वासंतिक वर्गाच्या आयोजनाचा हेतू विशद केला. दि.2 मे ते 20 मे पर्यंत सकाळी आठ ते सव्वादहा या वेळेत विविध उपक्रमांद्वारे या वासंतिक वर्गाचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य लक्ष्मण जांगळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.
बहुजन नेते पालक बापूसाहेब ठोकळे यांनी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी सांगोल्याच्या उजाड माळरानावर शिक्षणाची गंगा आणून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात यश फुलवल्याबद्दल ऋण पालक मनोगतातून व्यक्त केले. राजेंद्र लोखंडे सर यांनी पालक मनोगतावेळी विद्यार्थी विकास साधणारी विश्वसनीय शाळा म्हणून विद्यामंदिरचा नामोल्लेख केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव कोठावळे यांनी तर आभार आशुतोष नष्टे यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य गंगाधर घोंगडे, पर्यवेक्षक पोपट केदार, बिभीषण माने यांच्यासह सर्व शिक्षक-पालक-विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.