टेंभूचे पाणी बलवडी शिवारात दाखल ; दिपकआबांच्या हस्ते पाणीपूजन संपन्न ; जन्मभूमीला हिरवा शालू नेसवून शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर हसू फुलवने हेच आपले ध्येय ; दिपकआबा साळुंखे पाटील

नैसर्गिकदृष्ट्या अवर्षणप्रवण क्षेत्रात असलेल्या सांगोला तालुक्याची एक दुष्काळी तालुका म्हणून राज्याच्या नकाशावर ओळख आहे. आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या सांगोला तालुक्यातील जन्मभूमीची तहान भागवणे आणि उनाड ओसाड माळरानाला हिरवा शालू नेसवून येथील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलवणे हेच माझे आणि आमदार शहाजीबापू पाटील यांचे ध्येय असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.
बलवडी ता सांगोला येथील तब्बल 40 वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला कॅनॉल दुरुस्त करून टेंभूचे पाणी बुध्देहाळ तलावातून बलवडी येथील या कॅनलमध्ये पाणी सोडून तब्बल 40 ते 50 वर्ष तहानलेल्या बलवडी शिवारात हे पाणी दाखल करण्यात आले. या पाण्याचे पूजन करत असताना माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील बोलत होते. यावेळी बलवडीचे सरपंच ज्ञानेश्वर राऊत, उपसरपंच समाधान शिंदे, साहेबराव शिंदे, सूर्यकांत शिंदे, सचिन चव्हाण, चंद्रकांत मोहिते, रविराज लिगाडे, कौस्तुभ शिंदे व राहुल शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. तब्बल ४० ते ४५ वर्षांनीं प्रथमच बलवडी शिवारात पाणी दाखल झाल्याने येथील शेतकरी सुखावला आहे.
पुढे बोलताना माजी आमदार दीपकआबा म्हणाले, सांगोला तालुका दुष्काळमुक्त करून या तालुक्याच्या माथ्यावर लागलेला दुष्काळी कलंक पुसून टाकण्यासाठी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी व येथील शेतीला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सांगोला तालुक्यासाठी विविध योजनांतून मंजूर असणारे हक्काचे पाणी येथील शेतकऱ्यांना मिळावे म्हणून आपण वारंवार विधिमंडळात आवाज उठवला आहे. टेंभुसह म्हैसाळ योजनेचे पाणी सर्वप्रथम सांगोला तालुक्यात दाखल करून हा तालुका दुष्काळमुक्त होऊ शकतो हे आपण प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. यापुढील काळातही स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांनी प्रसंगी आपले प्राण पणाला लावून तालुक्याच्या जनतेला दुष्काळमुक्त करण्याचे दाखवलेले स्वप्न सत्यात उतरवून दाखवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असा निर्धारही शेवटी माजी आमदार दीपकआबांनी व्यक्त केला.