आदर्शवत ! कन्येच्या विवाह सोहळ्यानिमित्त सोसायटीकडून मिळालेले 25 हजार शाळेसाठी; आदर्श शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते अशोक पाटील गुरुजी यांचा कौतुकास्पद निर्णय

सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने सुरू असलेली ’भाग्यलक्ष्मी कन्यादान’ योजनेचे जनक, आदर्श शिक्षक समितीचे ज्येष्ठ नेते अशोक पाटील गुरुजी यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यानिमित्त सोसायटीतर्फे 25 हजाराचा चेक सुपूर्द करण्यात आला. यावेळी त्यांनी चेक स्वीकारून सदरची रक्कम स्वतःसाठी न वापरता सध्या कार्यरत असणार्या जि.प. प्रा.शाळा, सोमेवाडी या शाळेस स्वतःच्या कन्येच्या व शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते शाळेस सुपूर्द करण्यात आली.
यावेळी दादाशेठ बाबर (माजी जि प सदस्य), इंजि.रमेश जाधव (चेअरमन, खरेदी विक्री संघ सांगोला) , शहाजीदाजी नलवडे, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे व सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
चेकची संपूर्ण रक्कम रू.25 हजार सोमेवाडी गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, शिक्षण प्रेमी अर्जुन गोडसे यांचेकडे शाळेसाठी सुपूर्द करून शिक्षकांमध्ये नवीनच संकल्पना रुजवण्यात आली. श्री अशोक पाटील यांच्या या निर्णयाचे तालुक्यातील सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.