मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या समृद्धी केदारचा आपुलकीकडून सत्कार!

सांगोला (प्रतिनिधी )- घरची परिस्थिती हलाखीची. त्यात वडिलांचे छत्र हरवलेले. आईने दिवसभरात तीन -तीन ठिकाणी कामे केली. आई बरोबर मुलींनीही इतरांच्या शेतात कामे केली. कामे करत करत शिक्षणही पूर्ण केले आणि मोठ्या जिद्दीने व कष्टाने पोलीस भरतीसाठी ग्राउंड आणि लेखी परीक्षेचा अभ्यास करून थोरली विद्या मुंबई पोलीस दलात भरती झाली. आणि तिच्यापासून प्रेरणा घेऊन आता धाकटी समृद्धी हिची पण मुंबई पोलीस दलात निवड झाली. या निवडीबद्दल आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने केदार मायलेकीचा त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
सूतगिरणी – वासूद रस्त्यावर असलेल्या घरकुलात राहणाऱ्या समृद्धीला पोलीस भरतीसाठी अकॅडमी लावण्याची इच्छा होती. परंतु घरच्या गरीब परिस्थितीमुळे तीही लावता आली नाही. मात्र दिवसभर आईबरोबर कामाला जाऊन पहाटे चार वाजता उठून पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारा व्यायाम सांगोल्याच्या क्रीडा संकुलात तिने केला. कष्ट करण्याची तयारी आणि मनाशी जिद्द ठेवून तिने पहिल्या प्रयत्नात हे यश मिळविले असून लवकरच ती मुंबई पोलीस दलात दाखल होणार आहे. तिच्या या यशाबद्दल आई प्रतिभा बाळासाहेब केदार व भाऊ रणजित केदार यांना मोठा आनंद झाला असून भाऊ रणजित केदार हाही पोलीस भरतीसाठीच प्रयत्न करत आहे.
समृद्धी केदार हिच्या सत्कार प्रसंगी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, हरिभाऊ जगताप, विलास म्हेत्रे, अरविंद केदार, प्रमोदकाका दौंडे, उत्तम पाटील, जितेंद्र बोत्रे, प्रसन्न कदम, रविंद्र कदम आदी आपुलकी सदस्य उपस्थित होते.