शिंदे गटाचा पुन्हा गुवाहाटी जाण्याचा मुहूर्त ठरला?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून वारंवार समोर येत होत्या. शिंदे गटाच्या मंत्र्यांना अनेकदा पत्रकारांनी कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागे गुवाहाटीच्या नव्या दौऱ्याबद्दल विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी तारीख ठरली नसल्याचं उत्तर दिलं होतं. पण आता सूत्रांकडून मिळालेल्या नव्या माहितीनुसार, शिंदे गटाचा पुन्हा गुवाहाटी जाण्याचा मुहूर्त ठरला आहे. शिंदे गटाचे सर्व मंत्री आणि आमदार याच महिन्यात गुवाहाटीला जाणार आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा अद्याप प्रलंबित आहे. शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची आशा आहे. विशेष म्हणजे काही आमदारांच्या नाराजीच्या देखील बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे कदाचित याच विषयावर चर्चा करण्यासाठी शिंदे गट गुवाहाटीला जात असल्याची चर्चा आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे सर्व आमदार हे येत्या 26-27 नोव्हेंबरला गुवाहाटीला जाणार आहेत. शिंदे गटाचे सर्व आमदार-मंत्री गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. कामाख्या देवीच्या दर्शनासाठीच ते पुन्हा गुवाहाटीच्या दौऱ्यावर जात असल्याची माहिती समोर आलीय.