कोळा : कोळा ता. सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी स्मारकाचे पहिल्या टप्यातील काम पूर्ण झाले असून यासाठी जिल्हा परिषदेकडून २ कोटी रुपये मंजूर झाले होते त्याचे पहिल्या टप्यातील काम पूर्ण झाले असून यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ठेवण्यासाठी अस्थिविहार व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीची उभारणी केलेली आहे. सध्या हे स्मारक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. संपूर्ण स्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी १२.५ कोटी रुपयांची आवश्यकता असून दुसऱ्या टप्यातील कामासाठी ४.५० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या निधीसाठी वारंवार जि.प. कडून निधीची मागणी केलेली आहे.
आज सोलापूर मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी सदरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधी मागणीचा प्रस्ताव व स्मारकाच्या कामाचे सादरीकरण करण्यासाठी जि.प. सोलापूर बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला असल्याचे मा. जि.प. सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात राहिलेला १० कोटींचा निधी हा या राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब हे निश्चितच देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांनी जर हा निधी दिला तर संपूर्ण आंबेडकर अनुयायां मध्ये त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण होईल. व कोळा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असल्याने मुंबई येथील चैत्यभूमी व नागपूर येथील दिक्षा भूमी सारखेच पवित्र स्थान असल्याने ज्या आंबेडकरी अनुयायांना मुंबई किंवा नागपूर येथे जाणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी कोळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल व भविष्यात कोळे हे गाव सोलापूर जिल्ह्यातील एक पर्यटन स्थळ बनेल अशी आशा जि.प. सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी व्यक्त केली आहे.