समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे -डॉ भाई बाबासाहेब देशमुख

सांगोला(प्रतिनिधी):-सद्य परिस्थितीत अनेक महत्वपूर्ण व गंभीर प्रश्न प्रलंबीत असताना व ते सोडवणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक वेगळे प्रश्न निर्माण केले जात आहेत. जे प्रश्न सर्वसामान्य जनतेशी निगडीत आहेत त्या प्रश्नांना बगल दिली जात असून समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.
सांगोला तालुक्याचे अकरा वेळा प्रतिनिधीत्व केलेले आमदार स्व.गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांनी प्रदिर्घ काळ राजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली.परंतु एवढ्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी कोणावरही व्यक्तीगत टिका-टिपण्णी केली नाही.किंवा हेतुपुरस्कर कोणावरती वादग्रस्त टिपण्णी केली नाही.जे काय बोलायचे असेल ते चुकीच्या धोरणावरती बोलायचे, चुकीच्या कामावरती बोलायचे,उगीचच सतत वादग्रस्त वक्तव्य करीत बसायचे नाही किंवा कोणत्याही नेत्यावरती वैयक्तीक बोलायचे नाही एवढे नियम आबासाहेबांनी स्वतःला लावुन घेतले होते.कायम आचारसंहीतेत राहुन संविधानीक पध्दतीने राजकारण केले व त्या राजकारणातुनच आबासाहेबांनी समाजकारण साधले तोच आचार विचार सध्याच्या राज्यकर्त्यांनी अंगीकारला पाहिजे.
सध्या आपण वेगवेगळ्या प्रसारमाध्यमे किंवा सोशल मीडियावरती गरज नसणारी वक्तव्ये पहात -ऐंकत असतो ती समाजहिताची बिल्कुल नसतात.बोलणारे बोलुन जातात व समाजामध्ये चुकीचा मेसेज ताबडतोब जात असतो हे ते विसरतात.राजकारण हे समाजाची सेवा करण्यासाठीचे प्रभावी साधन आहे.राजकारणातील लहान मोठा कोणताही कार्यकर्ता असो त्यांनी सर्व समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवुनच काम केले पाहिजे.समाजामध्ये सर्व धर्म समभाव रुजविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न राज्यकर्त्यांनी केले पाहिजेत. समाजहित डोळ्यासमोर ठेवून राजकीय क्षेत्रात काम करणारे काही चांगले नेते होऊन गेलेत काही आज ही कार्यरत आहेत परंतु अशा नेत्यांची संख्या कमी प्रमाणात आहे हे सुद्धा कटू सत्य स्विकारले पाहिजे. सध्या राजकारणामध्ये काम करीत असताना अनेक प्रश्न प्रलंबीत असल्याचे पहावयास मिळत आहे. शेतकरी, कष्टकरी, बेकारी, कामगार,महिला, विद्यार्थी यांच्या प्रश्नावरती म्हणावे तसे कोणी आवाज उठवताना दिसत नसल्याचे मत डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.