…अन्यथा शेकाप रस्त्यावर उतरुन सरकारला जाग आणेल – डॉ.बाबासाहेब देशमुख; दूध दरवाढीसाठी शेकापचा एल्गार; रास्ता रोको संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकारने दुधाची दरवाढ करणे आवश्यक असून सरकारने शेतकर्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे वाईट परिणाम सरकारला भविष्य काळात भोगावे लागणार आहे. सरकारला शेतकर्यांची भाषा कळत नसून, नाईलाजाने रास्ता रोकोची हाक द्यावी लागली असून लवकरात लवकर दूध दरामध्ये वाढ करा अन्यथा शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरुन सरकारला जाग आणेल असा इशारा डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिला.
दूध दरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काल बुधवार दि.21 जून रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सांगोला पंचायत समोर पंढरपूर-मिरज मार्ग रोखून आंदोलन करण्यात आले. यावेळी गाईच्या दूधाला प्रती लीटर 40 रुपये दर व म्हशीच्या दुधाला 60 रुपये दर मिळालाच पाहिजे असा पवित्रा घेण्यात आला.रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
सदरच्या रास्ता रोकोला काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, रयत क्रांती, बहुजन क्रांती, मुस्लीम मोर्चा, संभाजी बिग्रेड सांगोला तालुका या संघटनांनी पाठिंबा दिला. यावेळी दत्ता टापरे, बापूसाहेब ठोकळे, बाळासाहेब बनसोडे, नंदकुमार शिंदे, तुषार इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार संजय खडतरे यांनी स्विकारले.
यावेळी शेकाप चिटणीस दादासाहेब बाबर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन इंजि.रमेश जाधव, मनोज ढोबळे, समाधान पाटील, अॅड.नितीन गव्हाणे, गिरीष गंगथडे, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, चंद्रकांत सरतापे, दिपक गोडसे, वैभव केदार, विष्णू देशमुख, सुरेश माळी,अॅड.मारुती ढाळे, नारायण जगताप, अॅड.धनंजय मेटकरी, अवधूत कुमठेकर,नागेश बिचुकले, यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी बांधव, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रास्ता रोको प्रसंगी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.