सांगोला विद्यामंदिरमध्ये देशभक्तांची ओळख व शाळा तेथे क्रांती मंदिर अभियान

सांगोला (प्रतिनिधी) कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने यांनी सुरू केलेले शाळेतील विद्यार्थ्यांच्या करीता ” ओळख देशभक्तांची व शाळा तेथे क्रांती मंदीर” हे अभियान गुरुवार दिनांक २२ जून २०२३ ते शुक्रवार दिनांक २३ जून २०२३ रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे संपन्न होणार आहे. या अभियानात कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने यांच्या संग्रहात असलेल्या २००० क्रांतिकारकांचे छायाचित्र, १०,३११ हुतात्म्यांची महिनावर नोंद, १०,००० क्रांतिकारकांची माहिती देणारा असा देशभक्तकोश या साहित्याचा दुर्मिळ असा डिजीटल डेटा सांगोला तालुक्यातील विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांतीमंदीर हे अभियान पोहोचेल व भारतीय क्रांतिवीरांच्या बलिदानाचा, राष्ट्र कार्याचा इतिहास विद्यार्थ्यांना अधिक ज्ञात होईल.कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे ही धर्मादाय संस्था गेल्या २३ वर्षापासून भारतीय क्रांतिवीरांनी चेतविलेल्या बलिदानाच्या ज्योतीचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे राष्ट्रीय कार्य करीत आहे. संस्थेच्या वरील उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ३५८ तालुक्यामधील विविध संस्था, शाळा, महाविद्यालये, सेवाभावी संस्थांना तसेच बेळगांव व गोवा राज्यात ठिकठिकाणी भेटी देऊन राष्ट्र जागरणाचे कार्य करण्याचे नियोजन आहे. उपरोक्त उपक्रमांतर्गत हा सर्व ऐतिहासिक ठेवा महाराष्ट्रासह बेळगाव व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांच्या करीता ” ओळख देशभक्तांची व शाळा तेथे क्रांतीमंदीर” या चालवलेल्या अभियानाद्वारे विद्यार्थी-विद्यार्थिनी करीता क्रांतिकारकांची दुर्मिळ माहिती उपलब्ध करून देणे म्हणजे एका प्रकारचे राष्ट्रकार्यच आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले आहे.
- सन १९३९ ते १९४२ पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महात्मा गांधीजींच्या ‘चले जाव’ चळवळी मधील विद्यार्थी संघटनेच्या सरचिटणीसपदी चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांची निवड झाली व पुढे त्यांच्या स्वातंत्र चळवळीतील सहभागामुळे त्यांना येरवडा कारागृहात एक वर्ष स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यांच्या या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची दखल तत्कालीन केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने घेऊन रोप्य महोत्सवी वर्षांमध्ये इ.स.१९७२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वतीने ‘ताम्रपट’ देऊन सन्मान झाला होता. आज या अभियानाच्या रूपाने सोलापूर जिल्ह्यातील देशभक्तांच्या इतिहासाबरोबर बापूसाहेब झपके यांच्या देशभक्तीची सांगोल्यात तालुक्यातील विद्यार्थ्यांना माहिती मिळणार आहे.हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे.