सांगोला तालुका गणित अध्यापक मंडळ सांगोला यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा सत्कार संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुका गणित अध्यापक मंडळ सांगोला यांच्यावतीने सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला येथे रविवार दिनांक 25 जून 2023 रोजी सांगोला तालुक्यातील सन 2023 मधील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत गणित विषयात विद्यालयात प्रथम आलेल्या 57 विद्यार्थी त्यांचे पालक व इयत्ता दहावी गणित विषय शिकवणारे त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचा मंडळाच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ व सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित संबोध, गणित प्राविण्य, गणित प्रज्ञा व गणित पारंगत या परीक्षेमध्ये सांगोला तालुक्यातील 1840 विद्यार्थ्यांनी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षांमध्ये सहभाग नोंदवून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. यामध्ये गणित प्रज्ञा परीक्षेमध्ये सांगोला तालुक्यातील 23 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय प्रमाणपत्रासाठी निवड झाली. या सर्व विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने सिल्व्हर मेडल व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्था अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके , संस्था सचिव म. शं . घोंगडे , विद्यामंदिर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक भीमाशंकर पैलवान, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, निलकंठ लिंगे यांच्या उपस्थितीत थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके यांनी सर्व विद्यार्थ्यांचे , पालक व शिक्षकांचे कौतुक केले. नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती देत शिक्षकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये बसून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत याविषयी मार्गदर्शन केले.
भीमाशंकर पैलवान यांनी थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याचा आढावा दिला. विद्यार्थ्यांना कृतीयुक्त प्रकारे गणित विषय कसा शिकवावा याचे उदाहरण देत सर्वांना मंत्रमुग्ध केले. पालक केदार गुरुजी, घोडके मॅडम व विद्यार्थी यांनी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मंडळाचे कौतुक करुन आभार व्यक्त केले.
प्रास्ताविक, स्वागत व मंडळाच्या वर्षभरातील कार्याचा उल्लेख मंडळाचे अध्यक्ष शिवाजी चौगुले यांनी केला.गुणवंत विद्यार्थी सन्मानचिन्ह दत्तात्रय लोखंडे व उत्तम सरगर यांनी दिल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सचिव आनंद खंडागळे व आभार प्रदर्शन उज्वला कुंभार यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांगोला तालुका गणित अध्यापक मंडळातील नीलकंठ लिंगे, दिलावर नदाफ, दत्तात्रय लोखंडे, दिलीपकुमार जाधव , प्रदीप धुकटे , नामदेव खंडागळे सर तसेच मंडळातील सर्व सहकारी शिक्षकांनी सहकार्य केले.