तालुका क्रीडा अधिका-यांच्या त्रासामुळे राजमाता क्रिकेट ॲकॅडमी स्थलांतर करण्याचा निर्णय : आनंदा माने

तालुका क्रीडा संकुलाची दरवर्षी स्वखर्चातून स्वच्छता करून क्रीडांगण स्वच्छ ठेवत असूनसुध्दा राजकीय हस्तक्षेपातून तालुका क्रीडा अधिकारी वारंवार त्रास देत असल्याच्या कारणामुळे क्रीडा संकुल येथून राजमाता क्रिकेट ॲकॅडमी स्थलांतर करण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती राजमाता प्रतिष्ठान व राजमाता क्रिकेट ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष मा. नगरसेवक आनंदा माने यांनी दिली.
सांगोला शहरामध्ये सामाजिक व क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असणा-या राजमाता प्रतिष्ठानचे काम पाहून तत्कालीन तहसिलदार यांनी क्रीडा संकुलाची स्वच्छता करण्याबाबत व क्रीडांगणाच्या वापरण्याबाबत सूचना केल्या असता राजमाता प्रतिष्ठानने स्वखर्चातून जवळपास एक ते दीड लाख रूपये खर्च करून तेथील सर्व चिलारीची झाडे, गवत काढून त्याठिकाणी मुरूम व माती भरून क्रीडांगण लेवल करून घेतले होते. तसेच 21 जून योगादिनानिमित्त जवळपास पन्नास ते साठ हजार रूपयांची झाडे आणून त्याठिकाणी वृक्षारोपण करून त्या झाडांना स्वखर्चातून टँकरने पाणी देवून ती झाडे जगविली. तसेच संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी त्याठिकाणी स्वच्छता केली आहे. 2015 साली तालुका क्रीडा संकुल येथे राजमाता क्रिकेट ॲकॅडमीची स्थापना करण्यात आली. या ॲकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना माफक दरात फी आकारली जात होती, तर काही गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जात होते. क्रिकेट ॲकॅडमीमध्ये मिळत असलेल्या योग्य प्रशिक्षणामुळे ॲकॅडमीमधून राज्य व जिल्हास्तरीय क्रिकेट संघामध्ये मुला-मुलींच्या निवडी होत राहिल्या. तसेच या क्रीडा संकुलामध्ये वेळोवेळी मोठया क्रिकेटच्या स्पर्धाही भरविल्या. यासाठी तत्कालीन तहसिलदार व तत्कालीन तालुका क्रीडा अधिकारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.
परंतू आताच्या परिस्थीतीमध्ये क्रीडांगण सुसज्ज झाले असल्यामुळे ते आता राजकीय लोकांना खुपत आहे. त्यामुळे राजकीय दबावापोटी तालुका क्रीडा अधिकारी यांच्याकडून पैशाची व एका विद्यार्थ्यामागे दरमहिन्याला शंभर रूपये देण्याची मागणी होत आहे. याच प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून राजमाता क्रिकेट ॲकॅडमी क्रीडा संकुलामधून इतरत्र स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला असून राजमाता प्रतिष्ठान सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात चांगले काम करून येणार्या काळात स्वत:चे चांगले क्रिकेट स्टेडीअम बांधणार असल्याचे आनंदा माने यांनी सांगितले.
तालुका क्रीडा संकुलामधील हायमास्ट दिवे बंद आहेत, तसेच तेथे प्राथमिक सोयी- सुविधांचा अभाव असून या गोष्टींकडे दुर्लक्ष करून क्रीडा अधिकारी मात्र राजमाता क्रीडा ॲकॅडमीसारख्यांना त्रास देण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवित आहेत. तसेच क्रीडा संकुलासाठी येणारा निधी व त्यामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल लवकरच वरिष्ठांकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याचेही आनंदा माने यांनी सांगितले.