विधवा महिलांनी खचून न जाता निर्भयपणे समाजात वावरले पाहिजे- राजश्री पाटील

गावोगावच्या विधवा व एकल महिलांनी घाबरून,खचून न जाता समाजामध्ये निर्भयपणें व स्वाभिमानाने वावरले पाहिजे पोलीस यंत्रणा गरज पडेल तिथं तुमच्या पाठीशी खंबीपणे उभी राहील. असे मत उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी व्यक्त केले. त्या काल महात्मा फुले सभागृह सांगोला येथे अस्तित्व संस्थेने आयोजीत केलेल्या विधवा व एकल महिलांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बचत गटाच्या कार्यकर्त्या अश्विनी पाटील या होत्या तर स्वागताध्यक्ष म्हणून एड. सुनिता धनवडे या होत्या व्यासपिठावर वाणीचिंचाळे गावच्या सरपंच प्रियांका गडहिरे, घेरडी ग्रामपंचायत सदस्या आरती जगधने, प्रा. तृप्ती प्रकाश बनसोडे, सुनिता गडहिरे, अर्चना खरचे या उपस्थित होत्या.

राजश्री पाटील पूढे बोलतांना म्हणाल्या की, विधवा व एकल महिलांनी छोटे छोटे व्यवसाय केले पाहिजेत, मुला-मुलींना शिक्षण दिले पाहिजे कुटुंबातील सदस्यांशी समन्वयाने वागले पाहिजे तर तुमची निश्चित प्रगती होईल सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे अस्तित्वच्या माध्यमातून तुम्हाला ताकत देण्याचे काम करतात.त्यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत रहा. यावेळी प्रा. तृप्ती बनसोडे म्हणाल्या की महिलांनी अंधश्रद्धा सोडून दिली पाहिजे स्वतः वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेऊन स्वतःच्या क्षमता वाढवल्या पाहिजेत मेळाव्यास सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील बहुसंख्य एकल व विधवा महिला उपस्थित होत्या.
उपस्थित अनेक महिलांनी आपापली मनोगते व्यक्त केली. उपस्थितांचे स्वागत सुनिता धनवडे यांनी केले तर प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते तथा अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे यांनी केले त्यांनी अस्तित्व संस्थेनं केलेल्या कामाची व विधवा व एकल महिला मेळावा घेण्यामागची भूमिका त्यांनी मांडली. मेळाव्यात विविध ठराव करण्यात आले त्यामध्ये विधवा महिलाना मिळणारी एक हजार रूपये पेन्शन वाढऊन ती पाच हजार रूपये करण्यात यावी, गॅस सिलेंडरसाठी सबसिडी द्यावी, घरकुल योजनेची एक लाख वीस हजार रुपयांची रक्कम वाढऊन ती चार लाख रूपये करावी, घर बांधकामासाठी दोन गुंठे जमीन गावठाणात उपलब्ध करून द्यावी. पोलीस स्टेशन मध्ये विधवा व एकल महिलांसाठी स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात यावा असे ठराव करण्यात आले. मेळाव्यात अनेक महिलांनी गाणी, उखाणे म्हटले. मेळाव्याचे सूत्रसंचलन अस्तित्व संस्थेच्या समन्वयक दिपाली भूसनर यांनी केले तर आभार सुनिता गडहिरे यानी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपाली भुसनर,प्रविण सुर्यागध, विशाल काटे, विजय धनावडे, संकल्प गडहिरे,खंडेराव लांडगे यांनी विशेष परिश्रम घेतले
“अस्तित्व”संस्थेच्या माध्यमातून सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील विधवा व एकल महिलाना कोविड काळात व कोविड पश्चात विविध प्रकारे मदत करून या महिलाना दिलासा देण्याचे काम केले आहे. विधवा व एकल महीलांच्या विकासाचे व सामाजिक सुरक्षेचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्याची गरज आहे.
सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे
(अध्यक्ष अस्तित्व संस्था सांगोला)



