भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराच्या अनेक संधी- डॉ.अजित पाटील; सांगोला विद्यामंदिर येथे करिअर गाईडन्सवर व्याख्यान संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे करिअर गाईडन्स विभागामार्फत भारतीय अर्थव्यवस्था व करिअरच्या संधी या विषयावर सेबीचे (SECURITY EXCHANGE BOARD OF INDIA) तज्ञ सल्लागार डॉ .अजित पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
यावेळी डॉ. पाटील बोलताना पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत कठोर परिश्रम, जिद्द चिकाटी व सातत्याच्या जोरावर यश प्राप्ती निश्चित आहे. अलीकडे जगाची अर्थव्यवस्था वेगाने बदलताना दिसते आहे. बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे रोजगाराच्या नवनवीन संधी व करिअरची व्यासपीठ नव्याने निर्माण होताना दिसत आहेत. याचा विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. व उपलब्ध संधीच सोनं करावं. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महासत्ता बनण्याची मोठी संधी आहे. जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून भारताकडे आज बघितले जाते. इंटरनेटच्या जमान्यात नवनवीन ॲप्स, ऑनलाइन शॉपिंग,शेअर मार्केट, यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा निर्माण करण्याची शक्ती आहे. विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षण न घेता व्यावसायिक शिक्षणावर विशेष भर दिला पाहिजे. आपल्या हातातील मोबाईलचा पुरेपूर आणि चांगला वापर केला तर बरसे काही कमवू शकतो. विद्यार्थी दशेपासून बचतीची सवय लागली पाहिजे. बचत ही भविष्यातील मोठी गुंतवणूक असेल. असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपप्राचार्य शाहिदा सय्यद. उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य सौ.शाहिदा सय्यद यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र कुंभार यांनी केले तर आभार प्रा.एन.डी.बंडगर यांनी मानले.