विद्यामंदिरने रुजवलेल्या मूल्यांवरच विद्यार्थी यशस्वी- सुधाकर लेंडवे; सांगोला विद्यामंदिर मध्ये शिष्यवृत्तीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान

माणूस जीवनभर विद्यार्थी असून विविध विषय समजून घेताना पाठांतरापेक्षा आकलनावर भर आवश्यक असतो.शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास विविध स्पर्धांमधूनच घडतो असे उद्गार सुधाकर लेंडवे साहेब (असि.रजिस्टर सह.संस्था,माढा) यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये आयोजित पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या चौफेर विकासासाठी विविध संधी सांगोला विद्यामंदिर प्रशाला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असून त्यांचा विद्यार्थ्यांनी योग्य रीतीने फायदा घेतल्यास भविष्यात विद्यामंदिर ही “अधिकाऱ्यांची शाळा” म्हणून नावारूपास येईल असेही पुढे बोलताना ते म्हणाले.
प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून पालकांनी विश्वास ठेवून विद्यामंदिरमध्ये दाखल केलेल्या रोपटेरुपी विद्यार्थ्यांचे शिक्षक काळजी, कष्ट व चिकाटीपूर्वक जोपासना करतात व त्याचे फलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व इतर गुणवत्तेतून दिसून येते.आज शाळेचे विद्यार्थी विविध विभागात अत्युच्च कामगिरी करत आहेत याचे समाधान व्यक्त करत यशस्वी विद्यार्थी पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
सदर कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांचा व पालकांचा सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने रोख पारितोषिक, ट्रॉफी, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन तसेच शिक्षक, विभागप्रमुख व नियंत्रकांचाही सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविकात प्राचार्य गंगाधर घोंगडे सर यांनी कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी 1952 स्थापन केलेल्या शाळेने आजवर निर्माण केलेले यशस्वी विद्यार्थी हीच शाळेची खरी संपत्ती असून शिक्षकांनी घेतलेले कष्ट फळाला येत असल्याची भावना व्यक्त केली.
डॉ.सौ.संगीता पिसे, प्रा.संतोष लोंढे, सौ.दिपाली नागणे, नारायण माळी सर या पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या यशात शाळेचे नियोजन व शिक्षकांची तत्परता महत्त्वाची असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आभार उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते यांनी तर सूत्रसंचालन वैभव कोठावळे यांनी केले. शेवटी विद्यार्थी पालक व शिक्षकांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम प्रसंगी पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, संस्था बाह्यपरीक्षा विभागप्रमुख शिवाजी चौगुले, प्रशाला बाह्यपरीक्षा विभागप्रमुख नामदेव खंडागळे, विद्यार्थी-पालक-शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.