वर्तमानातील प्रयत्नांवरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल-प्राचार्य घोंगडे ; सांगोला विद्यामंदिरमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती पालकसभा संपन्न

सांगोला (वार्ताहर) शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या तिहेरी प्रयत्नातूनच विद्यार्थी घडतात यासाठी पालकांनी जागृत राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे.विद्यार्थ्यांच्या आजच्या कष्टावर, प्रयत्नांवरच त्यांचे उज्ज्वल भविष्य अवलंबून असून यासाठी विद्यार्थ्यांनीही मनात तीव्र इच्छाशक्ती बाळगावी.उच्च ध्येय ठेवावे असे उद्गार प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाच्या शिक्षक-विद्यार्थी-पालक सभेवेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.वाचन व लेखनाच्या सरावातून विद्यार्थ्यांना प्रभावी आकलन होते व विषयातील गुणवत्ता सिद्ध करता येते. विद्यार्थ्यांनी मनातून न्यूनगंड काढून जिद्दीने आणि आत्मविश्वासाने प्रश्नांना सामोरे जात शिक्षकांच्या मदतीने शंका दूर करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
प्रास्ताविकात पर्यवेक्षक पोपट केदार यांनी गतवर्षीच्या निकालाचा आढावा घेत पालकांसाठी काही मार्गदर्शनपर सूचना दिल्या.विद्यार्थ्यांचे मानसिक, शारीरिक व बौद्धिक आरोग्य जपण्यास सांगितले.सुरुवातीस सर्व शिक्षकांचा परिचय करुन देण्यात आला.
विभाग प्रमुख रमेश बिले यांनी संपूर्ण वर्षभरात राबवण्यात येणारे स्कॉलरशिप परीक्षेचे नियोजन व अभ्यासाची अपेक्षित पद्धत पालकांसमोर सविस्तर मांडले. यावेळी इंग्रजी विषयशिक्षिका शुभांगी पलसे आणि गणित विषयशिक्षिका उज्वला कुंभार यांनी आपल्या विषयासंदर्भात मार्गदर्शन केले. निकिता पाटील, हणमंत राऊत सर,उमेश महाजन सर, दौलतराव खंडागळे सर यांनी पालक मनोगतातून आपल्या विद्यार्थ्यांच्या शंका मांडल्या. पालक मनोगतातून मांडलेल्या शंकाचे निरसन प्रशाला बाह्यपरीक्षा विभागप्रमुख वैभव कोठावळे सर यांनी केले.
आभार उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते यांनी तर सूत्रसंचालन शुभांगी पलसे यांनी केले.या सभेसाठी संस्थाबाह्यपरीक्षा विभागप्रमुख नामदेव खंडागळे, उमेश नष्टे, सचिन बुंजकर, महेश ढोले यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.