चारा छावणी चालक सरकारकडून वार्यावर-प्रा.लक्ष्मण हाके

सांगोला (प्रतिनिधी):-2018-19 च्या चारा छावणीची बिले मिळाली नसल्यामुळे सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालक सांगोला तहसील कार्यालयासमोर जनावरांसह आंदोलन करीत आहेत. त्या आंदोलनास आज गुरुवार 27 जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते प्रा.लक्ष्मण हाके यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.
2019 च्या दुष्काळी परिस्थितीत सांगोला तालुक्यात 146 छावण्या आणि मंगळवेढा तालुक्यात 54 छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत या दोन तालुक्यातील जबाबदार शेतकर्यांनी चारा छावण्या सुरू केल्या, मात्र प्रशासनाच्या अडेल भूमिकेमुळे आजही चारा छावणी चालक मेटाकुटीला आले आहेत. दोन्ही तालुक्यातील जवळ जवळ 36 कोटी रुपयांची बिले शासनाकडे प्रलंबित आहेत. ग्रामसेवक, तलाठी, कृषिसहायक,सर्कल, तहसीलदार या शासनाच्या प्रतिनिधीनी योग्य ती पाहणी करून ऑनलाइन अहवाल शासनाला देऊनही बिल मंजूर होत नसल्याने या दोन तालुक्यातील चारा छावण्या चालविणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ते जनावरांसह सांगोला तहसील कार्यालयासमोर आंदोलन करीत आहेत.
याकडे आ. शहाजीबापू पाटील आणि आ.समाधान अवताडे यांनी लक्ष घालून शासनाकडून ही बिले मंजूर करावीत अन्यथा येणार्या काळात उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते प्रा.लक्ष्मण हाके यांनी दिला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, छावणी चालक, शेतकरी उपस्थित होते.