छावणी चालकांच्या बँक खात्यावर पैसे जमा होईपर्यंत दिपकआबा लढ्यामध्ये सहभागी असेल प्रलंबित चारा छावणी चालकांच्या बिलाचा प्रश्न मार्गी लावू : मा. दिपकआबा साळुंखे पाटील

वेळेप्रसंगी कुटुंबातील माय- बहिणीचे- पत्नीचे सोने गहाण ठेवून शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील पशुधन जगवण्याचे काम छावणी चालकांनी केले आहे. मागील पाच वर्षापासून छावणी चालक बिलासाठी हेलपाटे मारत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, छावणी चालकांच्या बँक खात्यावर पैसे जमा होईपर्यंत दिपकआबा तुमचा सहकारी म्हणून या लढ्यामध्ये सहभागी असेल, छावणी चालकांचे रखडलेले बिल जमा करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी बोलून तसेच अर्थमंत्री यांनाही या संदर्भात बोलून हा विषय मार्गी लावू. दरम्यान राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजितदादांच्या शब्दाला वजन आहे निश्चितपणे हा प्रश्न मार्गी लावला जाईल. तोपर्यंत आपण हा लढा सुरूच ठेवू असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. दिपक आबा साळुंखे पाटील यांनी सांगितले.
प्रलंबित चारा छावणी बिलाच्या संदर्भात सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी चालकांनी सांगोला तहसील कार्यालयासमोर जनावरांसहित धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच काल शुक्रवार दिनांक 28 रोजी मा. आम. दिपक आबा साळुंखे पाटील यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन छावणी चालकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी प्रलंबित छावणी चालकांच्या बिलासंदर्भात बोलत ते होते.
यावेळी युवा नेते डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते शिवाजीअण्णा गायकवाड, माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ खडतरे, नवनाथभाऊ पवार, माजी सरपंच विनायक मिसाळ, संतोष पाटील, युवा ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवासदादा करे यासह चारा छावणी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जोपासत येथील नागरिकांनी लोकांची जनावरे जगवली. मोठ्या पोट तिडकीने छावणी चालकांनी आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्याला यश मिळाले नाही. यावर छावणी चालकांनी आपला लढा सुरू केला आहे. तालुक्याची मागील अनेक वर्षापासून सामाजिक कामांमध्ये राजकारण बाजूला सोडून एकत्रित येऊन प्रश्न मार्गी लावण्याची ही प्रथा आजही कायम आहे. याबाबतीत नुकतेच आम. शहाजीबापू पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना पत्र देण्यात आले आहे. इतरही मंडळी या संदर्भात भेटी घेत असल्याची माहिती आहे. मी देखील त्यांच्याशी चर्चा करणार असून, ते माझे देखील राजकीय सहकारी आहेत. यासह उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी देखील बोलून याविषयी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि ही माझी बांधिलकी आहे. छावणी चालकांनी अमरण उपोषणाचा पर्याय निवडल्याची माहिती मिळत आहे परंतु छावणी चालकांच्या अमरण उपोषणामध्ये मी देखील सहभागी असणार आहे. तत्पूर्वी आपला प्रयत्ना निश्चितपणे सुरू राहील आणि याला यश मिळेल अशी अपेक्षा असून खात्यावर पैसे येईपर्यंत हा लढा असा सुरू राहील. पैसे खात्यावर मिळेपर्यंत दिपकआबा तुमच्यासोबत असेल असा ठामपणे विश्वास या निमित्ताने आंदोलन कर्त्यांना दिला.