विद्यानगर मधील रस्त्याची चाळण,चिखलातून मार्ग काढताना नागरिकांना नाकीनऊ

सांगोला:येथील विद्यानगर कॉलनी परिसरातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने रस्त्यावरून चालत जाणेही मुश्किल झाले असून नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्ता करावा अशी मागणी सर्व नागरिकांकडून होत आहे.
येथील मुख्य चौकापासून विद्यानगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.या रस्त्यावरून शाळेची मुले,शिक्षक वर्ग, प्रशासकीय वर्ग तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे.या चिखलातून जाताना शाळेचे विद्यार्थी अनेक वेळा सायकल स्लिप होऊन पडले आहेत.सदर रस्ता करून सुमारे 15 वर्षे झाली आहेत.मात्र या रस्त्याची डागडुजी झाली नाही.त्यामुळे रस्त्यात खड्डा की चिखलात रस्ता आहे असा प्रश्न पडला आहे.त्यामुळे काय तो रस्ता,काय ते नगरपरिषद प्रशासन, काय तो चिखल एकदम अनओके म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे.
याच विद्यानगर कॉलनी मध्ये एक हॉस्पिटल असून,रुग्णांना याच रस्त्याने जावे लागते.त्यामुळे रुग्णांचे देखील हाल होत आहेत.मात्र नगरपरिषद प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांना या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी या गंभीर प्रकारची दखल घेऊन तात्काळ रस्ता करावा अशी मागणी होत आहे.