सांगोला तालुका

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान,सांगोला व रोटरी क्लब ऑफ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने बचतगट महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):-शनिवार दि. 24 डिसेंबर 2022 रोजी माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 11 वाजता माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या बचतगटातील महिलांचा वार्षिक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
संस्थेच्या मेळाव्याचे हे 25 वे वर्ष आहे. मेळाव्याची सुरुवात पाहुण्यांचे स्वागत करून झाली. यानंतर अश्विनी कुलकर्णी यांनी गीत गायन केले. पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांची आणि रोटरी क्लब ऑफ सांगोलाचे अध्यक्ष रो. दत्तात्रय पांचाळ यांची ओळख नीता लाटणे यांनी केली.

रो. दत्तात्रय पांचाळ सर यांनी रोटरी क्लबची थोडक्यात माहिती सांगितली.गेल्या वर्षी रोटरी क्लब ने अनेक विद्यार्थिनींना सायकल वाटप आणि महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले आहे.त्यांनी संस्थेच्या कार्याचे ही कौतुक केले. गेली काही वर्षे रोटरी क्लब ऑफ सांगोला संस्थेच्या या मेळाव्यासाठी सहकार्य करीत आहे.
यानंतर संस्थेतर्फे कै. डॉ. तारा गोडबोले यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘श्रमलक्ष्मी’ पुरस्कार संस्थेच्या ‘चांद’ बचतगटातील सभासद सौ. प्रिया पांडुरंग कुलकर्णी यांना तर रोटरी क्लब ऑफ सांगोला तर्फे देण्यात येणारा ‘रणरागिणी’ पुरस्कार ‘कौशल्य’ बचतगटातील सभासद सौ.राजाक्का मारुती साळुंखे यांना प्रदान करण्यात आला. प्रमुख पाहुणे श्री. नितीन शेळके, ए. जी. एम, नाबार्ड, सोलापूर यांनी महिलांना नाबार्ड च्या विविध योजनांची माहिती दिली. नाबार्ड ही बँक भारतातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी ,शेतकर्‍यांसाठी काम करते.नाबार्ड चा भारताच्या कृषी क्षेत्राला खूप मोठा फायदा झाला आहे. नाबार्ड ने यापूर्वी 119 करोड बचतगटांना जवळ जवळ 1 लाख करोड रुपये इतके कर्ज मिळवून दिले आहे. गरीबी निर्मूलनाचा कार्यक्रम गाव पातळीवर राबवणारा भारत हा जगात सर्वात पहिला देश आहे.अशी माहिती त्यांनी सांगितली. संस्था गेली 44 वर्षे करीत असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. सध्या नाबार्ड तर्फे सुरू असलेला कौशल्य विकास कार्यक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेऊन त्यातून व्यवसाय सुरू करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा. फळप्रक्रिया सारखे शेतीपुरक व्यवसाय करावेत असे मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढे संस्थेच्या बचतगटातील महिलांना नाबार्ड नक्कीच सहकार्य करेल आणि संस्थेच्या जलसंधारण कामासाठी ही नाबार्ड मदत करेल असा विश्वास दिला.
या वेळी जिल्हा अग्रणी बँकेचे ’आर्थिक साक्षरता सल्लागार समुपदेशक’ श्री. हनुमंत भालेराव हे महिलांना बचतगटाबाबत मार्गदर्शन केले. मानवाच्या जन्मापासून चा इतिहास सांगत मानवी जीवनात पैशाचे महत्व आणि गरज कसे वाढत गेले याबाबत माहिती दिली. भारतात बँकेची सुरुवात कधी झाली. रिसर्व बँकेची कामे,लीड बँक म्हणजे काय, बचतगटांची सुरुवात कोठे आणि कशी झाली?, बँकांच्या बचतगटासाठीच्या विविध योजना, गटातील धन व्यवहार आणि मनव्यवहार कोणते? गटाचे कर्ज आणि बँकेचे कर्ज यातील फरक? आर्थिक साक्षरता म्हणजे काय? आणि बचतगटामुळे गावातील सावकारी कशी हद्दपार झाली. सरकारी विमा, बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज कसे मिळते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मागील वर्षी 100 टक्के परतफेड असलेल्या वाटंबरे येथील ’सावली’ बचतगटाच्या गटप्रमुख विजया पवार आणि मेळाव्यास 100 टक्के उपस्थिती असलेल्या एखतपूर येथील अनिता नवले या गटप्रमुखांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या उत्कर्ष कलावर्धिनीची विद्यार्थिनी मनस्वी कुलकर्णी हिने गणेशवंदना नृत्य सादर केले तर संस्थेच्या माजी शिक्षिका मंगल लाटणे यांनी ’बुरगुंडा’भारुड सादर केले. त्यांना संस्थेच्या कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी साथ दिली. या भारुडातून त्यांनी संस्थेच्या विविध विभागांची माहिती देऊन जास्तीत जास्त महिलांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा फायदा घ्यावा असे सांगितले. सध्या संस्थेत सुरु असलेल्या क्लिनिंग प्रोडक्टच्या प्रशिक्षणात तयार केलेल्या विविध वॉशिंग पावडर, भांड्याची पावडर, हरपवुरीह, फिनेल, हार्पिक इ. पदार्थांचा विक्री स्टॉल लावण्यात आला होता. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात आभार संस्थेच्या खजिनदार डॉ. शालिनी कुलकर्णी मानले तर सूत्रसंचालन सौ. संपदा दौंडे यांनी केले. यावेळी महिलांना अल्पोपहार देण्यात आला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.संजीवनी केळकर,उपाध्यक्षा माधवी देशपांडे, सहसचिव वसुंधरा कुलकर्णी, खजिनदार डॉ. शालिनी कुलकर्णी, रोटरी चे अध्यक्ष रो. दत्तात्रय पांचाळ सर, सचिव रो.इंजि. विकास देशपांडे आणि इतर सभासद, संस्थेचे पदाधिकारी,माजी शिक्षिका, उत्कर्ष विद्यालयाचे तीनही विभागांचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी संस्थेचे कर्मचारी आणि बचतगट सभासद असे 400 जण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!