गणेश नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रानभाजी महोत्सव साजरा

नाझरा(वार्ताहर):- पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पालेभाज्यांची ओळख व्हावी त्याचबरोबर त्या पालेभाज्यातून मिळणाऱ्या विविध अन्न घटकांची माहिती व्हावी यासाठी ऑगस्ट महिन्यात विविध ठिकाणी रानभाजी महोत्सव घेतला जातो.चोपडी केंद्रातील गणेश नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख गाडे सर, विस्तार अधिकारी नवले सर यांच्या प्रोत्साहनातून मुख्याध्यापक राजाराम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षिका रूपाली पवार यांनी रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होते.
या रानभाजी महोत्सवात परिसरात पिकणाऱ्या विविध प्रकारच्या पालेभाज्यांचा त्याचबरोबर फळभाज्यांचा समावेश करण्यात आला होता.प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक पालेभाजी तसेच फळभाजी अशा प्रकारे या महोत्सवाचे नियोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पालेभाज्यांचे महत्त्व व त्यांची ओळख झाल्याने पालकांमधून या महोत्सवाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. कोणती भाजी आपल्या शरीरातील कोणत्या अवयवासाठी अत्यंत महत्त्वाची आहे याबाबत विस्तृत मार्गदर्शन पवार मॅडम यांनी केले.या महोत्सवात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश खळगे व सर्व सदस्य माता पालक यांनी भेट देऊन या रानभाजी महोत्सवाचे कौतुक केले.