पाल्याच्या गुणवत्ता वाढीसाठी पालकांची साथ आवश्यक – प्राचार्य गंगाधर घोंगडे

इ.१२ वी नंतर सर्वच शाखेतील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून त्याचा शोध घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे महत्त्व लक्षात घ्यावे. चांगले गुण अंगिकारावेत. पालकांनी पाल्यांकडे अधिक लक्ष देऊन पाल्याच्या बाबतीत जागरूक राहावे.पाल्याच्या यशस्वीतेसाठी शिक्षकांबरोबरच पालकांची तितकीच साथ आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालक-शिक्षक सभेचे अध्यक्ष तथा प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी केले.
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इ.१२ वी कला,वाणिज्य व शास्त्र शाखेतील पालक-शिक्षक सभेमध्ये ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या सौ.शहिदा सय्यद उपस्थित होत्या.यावेळी ज्युनिअर कॉलेज मधील प्रा.राजेंद्र कुंभार,प्रा.विजयकुमार सासणे,प्रा.गणेश घेरडीकर यांनी मनोगते व्यक्त करून उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित पालकांपैकी ॲड.सौ.सुप्रिया बोत्रे,सौ.संगिता देवळे,प्रा.सौ.राणी वेदपाठक,कु.शिवानी देवळे,जितेंद्र गणेचारी, बाळासाहेब पंडीत यांनी मनोगते व्यक्त करून ज्युनिअर कॉलेज राबवित असलेल्या उपक्रमाविषयी कौतुक करत काही उपयुक्त सूचना मांडल्या.उपप्राचार्या सौ.शहिदा सय्यद आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य,नियोजन, जिद्द,चिकाटीपणा ठेवत परिश्रमाची तयारी ठेवून अभ्यास केल्यास परीक्षेत निश्चित यश मिळेल.
पुढे बोलताना प्राचार्य घोंगडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी मोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिआ पासून दूर राहावे.ध्येय समोर ठेवावे व ती मिळण्यासाठी मनाची गुंतवणूक व मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावी,तसेच यश मिळवलेल्या मान्यवरांचे अवलोकन करावे.पालकांनी कुटुंबामध्ये सुसंवाद वाढवावा. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी चांगली स्वप्ने पाहावीत,स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर सभेसाठी ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक,सुज्ञ पालक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. तानसिंग माळी,सूत्रसंचालन प्रा.सौ.अश्विनी जालगिरे यांनी केले तर प्रा.सागर बुधावणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.