शिरभावी येथील जळीतग्रस्त सुतार कुटुंबियांना आपुलकी प्रतिष्ठान कडून मदत

सांगोला (प्रतिनिधी )- शिरभावी येथील जळीतग्रस्त सुतार कुटुंबियांना आपुलकी प्रतिष्ठान कडून संसारोपयोगी साहित्य व किराणा मालाची मदत करण्यात आली.
समाधान दिलीप सुतार रा. शिरभावी यांच्या राहत्या घराला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली व क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले, आणि सुतार यांचा प्रपंच उघड्यावर आला. याबाबत आपुलकी सदस्य इंजि. बाळासाहेब नकाते यांनी माहिती दिल्यानंतर तातडीने आपुलकी सदस्यांनी सुतार यांच्या घरी शुक्रवारी सकाळी भेट देऊन पाहणी करून संसारोपयोगी साहित्य, कपडे, किराणा माल व मुलांना शैक्षणिक साहित्य देण्याचे नियोजन करून शुक्रवारी सायंकाळी शिरभावी येथे या कुटुंबाला आपुलकीची मदत देऊन सहकार्य केले.
यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, मार्गदर्शक रमेशअण्णा देशपांडे, अरुण जगताप गुरुजी, अरविंद डोंबे गुरुजी, इंजि. बाळासाहेब नकाते, इंजि. विकास देशपांडे, अण्णासाहेब मदने गुरुजी, प्रमोदकाका दौंडे, शिरभावीचे सरपंच बाळासो बंडगर, माजी सरपंच पांडुरंग बंडगर, ग्रा. पं. सदस्य प्रमोद ढोले आदी उपस्थित होते.