दुसऱ्या दिवशीच्या सामन्यांमध्येही चुरस कायम; गुरुवर्य बापूसाहेब झपके राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी कै. गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके ४२ वा.स्मृतीसमारोह पुरूषांच्या निमंत्रित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सत्रातील चुरशीच्या सामन्यात दानिश शेखच्या (१९ गुण ) शानदार खेळीमुळे मध्यंतरापर्यंत २७-१५ अशी आघाडी असतानाही सोलापूरच्या ग्रीन स्टार स्पोर्ट्स क्लबला मुंबईच्या घाटकोपर संघाकडून ५६-५८ पराभव स्वीकारावा लागला. यावेळी खेळाडूंचा आत्मविश्वास, जिंकण्यासाठीचे कमालीचे प्रयत्न सांगोलकरांनी व क्रीडा प्रेमींना अनुभवले व सामन्यातील चुरस काय असते याचा प्रत्यय घेतला .
याशिवाय या सत्रामध्ये संभाजीनगरने मुंबईच्या प्रोनेटस क्लबवर ५६-२१ असा सहज विजय मिळविला.सोलापूरच्या विद्या प्रतिष्ठानने सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनवर ३३-१८ अशी मात केली. कडाच्या जयहिंद जिमखाना संघाने मिरजचा ७५-४५ असा धुव्वा उडविला. त्याचबरोबर
आज सकाळी इतर सामन्यामध्ये मुंबई पोलीस बॉईज वि.वि. वाय.एम.सी.ए. कुलाबा मुंबई ५१-२९, मॉर्निंग ग्रुप मिरज वि.वि.डू ईट कोल्हापूर २६-२४ या गुणांनुसार अटीतटीचा खेळ झाला.
तसेच आज ए.सी.ए.पुणे विरुद्ध घाटकोपर मुंबई, जयहिंद जिमखाना कडा विरुद्ध घाटकोपर वाय.एम.सी.ए.मुंबई, विद्या प्रतिष्ठान सोलापूर विरुद्ध ऑल स्टार क्लब संभाजीनगर, मुंबई पोलीस बॉईज विरुद्ध कोल्हापूर बॉईज असे उपांत्यपूर्व सामने होणार आहेत.
या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी व समारोपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासंदर्भात आवाहन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्था अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सामना समिती सचिव प्रशांत मस्के व पदाधिकारी,सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशन सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
रविवारी साय .५ वा. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार मा. संजयजी बनसोडे यांचे शुभहस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा. बसवराज पाटील – नागराळकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्योगपती सिद्धार्थ झपके,विलास क्षीरसागर, सुहास होनराव,ज्ञानेश्वर तेली ,नागेश तेली,मंगेश म्हमाणे, रत्नाकर ठोंबरे यांची उपस्थिती आहे.