…त्या दिलेल्या शब्दानुसार आज विकास पर्वतातील सोनेरी पान उघडले-आ.शहाजीबापू पाटील; सांगोला येथे 22 कोटी रूपयांच्या विकासकामांचे शानदार उद्घाटन

मी आणि दिपकआबा लहान माणसे आहोत. आम्ही फार मोठी माणसे नाहीत. सर्वसामान्य कुटुंबातील तुमच्यासारखेच आम्ही आहोत. मला आणि दिपकआबांना तुम्ही ताकद व शक्ती देताय त्याचप्रमाणे आमच्या पाठीशी सर्वसामान्य जनतेचे आशिर्वाद व शुभेच्छा असल्यामुळे सांगोला तालुक्यात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात घडली. आमदार होत असताना मी आणि दिपकआबांनी 2019 च्या निवडणुकीत जनतेला अभिवचन दिल्याप्रमाणे एक संधी देवून बघा, तालुक्याचे विकासाचे गणित आम्ही बदलून दाखवू त्या दिलेल्या शब्दानुसार आज सांगोला तालुक्याच्या विकास पर्वतातील सोनेरी पान आपण उघडले असल्याचे आ.शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
सांगोला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व वंदे मातरम चौक ते मिरज रोड बायपास रस्ता या दोन्ही कामांचा भूमिपूजन सोहळा काल सोमवार दि.11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी आ.शहाजीबापू पाटील बोलत होते.
पुढे बोलताना आमदार शहाजीबापू म्हणाले, कधी बघु न शकणार्या परिसराला सुंदर व सुसज्ज परिसर निर्माण करण्यासाठी काम अतिशय सुंदर झाले पाहिजे. तालुक्यातील विकाम कामासाठी कितीही निधी लागला तरी तो शासनाकडून आणायची जबाबदारी मी पार पाडतो. परंतू कामे दर्जेदार करावी, असे आवाहन आम.शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले, 50-60 वर्षापासून तालुक्यातील शासकीय कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे हेलपाठे मारुन जनता वैतागली होती. प्रशासकीय इमारतीमुळे सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार असल्यामुळे अधिकारी वर्गांवर आता कंट्रोल राहणार आहे. सांगोला तालुक्यात आता विकासाचे वातावरण सुरु झाले असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक इंजि.अशोक मुलगीर यांनी केले.
व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, राष्ट्रवादीचे नेते बाबुराव गायकवाड, भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, तानाजीकाका पाटील, खंडू सातपुते, प्रा.संजय देशमुख, बशीर तांबोळी, दादा लवटे, सोमेश यावलकर, अनिल खडतरे, गणेश कदम यांच्यासह सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.