सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या कामामध्ये हयगय नको- डॉ.अनिकेत देशमुख

सांगोला(प्रतिनिधी):- सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही. तालुक्यातील बर्याच विभागात आर्थिक वाटाघाटी केल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांची कामे होत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील प्रशासकीय अधिकार्यांनी सर्वसामान्य जनतेस वेठीस न धरता ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांच्यासह गोरगरीब लोकांच्या कामांना प्राधान्यक्रम द्यावा. प्रशासकीय यंत्रणेने लोकहिताच्या कामांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन कामे करावीत. सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या कामामध्ये हयगय नको असे आवाहन शेकाप नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी केले आहे.
शासकीय यंत्रणेची दिवसेंदिवस मुजोरगिरी वाढली असून त्याचा त्रास नागरिकांना नाहक सहन करावा लागत आहे. तालुक्यातील प्रशासकीय अधिकार्यांच्या कामकाजाबाबत नागरिक तक्रारीचा पाढा वाचत आहेत. तालुक्यातील तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन, वीज मंडळ , पंचायत समिती कडील प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या धर्तीवर डॉ.अनिकेत देशमुख बोलत होते.
सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी हम करे सो कायदा याप्रमाणे वागत आहेत. नागरिकांची कामांना जाणीवपूर्वक विलंब केला जात असून सर्वसामान्य जनतेची कामे आर्थिक देवाण-घेवाण केल्याशिवाय होत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.नागरिकांना तक्रार करुनही न्याय मिळत नाही. त्यामुळे सामान्य जनतेत प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण तयार झाले आहे.
तालुक्यातील गोरगरीब नागरिक, तक्रारी घेऊन गेल्यानंतर अधिकारी-कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. सांगोला तालुका हा डॉ.भाई.गणपतराव देशमुख यांच्या विचाराचा तालुका आहे. आबासाहेबांनी आपल्या कार्यकाळात सर्वच शासकीय कार्यालयावर दरारा ठेवला होता. त्यामुळे अधिकार्यांनी जनतेच्या कामांकडे प्राधान्याने लक्ष देवून अडचणी सोडवित होते. परंतू सध्य परिस्थितीत आपले कोणीच काही करू शकत नाही ही मानसिकता प्रशासकीय वर्गामध्ये दिसून येत आहे. या मानसिकेमध्ये आता बदल करुन जनतेच्या, लोकहिताच्या कामांना प्राधान्य द्यावे, अन्यथा शेकाप आक्रमक भूमिका घेणार असल्याचे डॉ.अनिकेत देशमुख यांनी सांगितले.