सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलची क्षेत्रभेट संपन्न.*
सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलची क्षेत्रभेट नृसिंहवाडी,कोल्हापूर या ठिकाणी संपन्न झाली. बुधवार दि.13/9/2023रोजी सकाळी ठीक 6-00वा.विद्यालयातून प्रस्थान झाले.सर्वप्रथम नृसिंहवाडी येथे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पवित्र संगमावरती नयनरम्य तीरावरती वसलेल्या दत्त मंदिरामध्ये श्रीदत्ताचे दर्शन घेतले.
या नंतर ही सहल कोल्हापूरपासून १२कि.मी अंतरावर असणाऱ्या कन्हेरी मठ येथील सिध्दगिरी वस्तुसंग्रहालयास भेट दिली. या ठिकाणी म्युझियमबरोबरच,तारांगण,ट्रेन, बगीचा ही ठिकाणे दाखविण्यात आली.सिध्दगिरी वस्तुसंग्रहालयाच्या सुरूवातीलाच बारा राशींची बारा शिल्पे आहेत. त्यानंतर गुहेसदृश भागातून आत जाताच प्राचीन भारतातील ऋषीमुनींचे कोरीव पुतळे बनवले आहेत.ऋषींची नावे,त्यांची विद्या आणि त्यांचे योगदान या विषयीची माहिती त्या ठिकाणी पाहावयास मिळाली. गुहेतून बाहेर पडल्यावर दोन्ही बाजूला हिरवीगार शेते आणि त्यात काम करणारी माणसे दिसतात. धान्यांची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया या प्रतिकृतीतून दाखवण्यात आल्या आहेत. याचबरोबर शेतामध्ये असणारा बैल, गायी, म्हशी यांचा असणारा वावर, लगोरी, सूरपारंब्या,लंगडी यांचे प्रत्यक्ष दर्शन या प्रतिकृतीतून अत्यंत बारकाईने टिपले गेले आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांना या प्रतिकृतीतून ग्रामीण जीवनाचे दर्शन घडले.यानंतर विद्यार्थ्यांनी तेथील महाप्रसादाचा आस्वाद घेतला तसेच तेथील असणाऱ्या बगीच्यामध्ये ट्रेनसफरीचा आनंद घेतला.तारांगण या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपग्रहाविषयी माहिती देण्यात आली.
यानंतर कोल्हापूर येथील शाहू पॅलेस येथे भेट दिली या परिसरात बाग, तलाव, प्राणी संग्रहालय, कुस्ती मैदान यांचा समावेश आहे. तसेच या संग्रहालयात छ.शाहू महाराज यांच्या कपड्यांचा संग्रह, तलवारी, शॉटगन,यासारखे प्राचीन काळातील संग्रह पाहावयास मिळाले याबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती घेतली व यानंतर भोजनाचा आस्वाद घेऊन ही सहल सुखरूप विद्यालयात पोहचली.
ही क्षेत्रभेट मुख्याध्यापिका कु.सरिता कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली यासाठी विभाग प्रमुख श्री. संतोष बेहेरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.