नाझरा विद्यामंदिर प्रशालेत “श्री” चे उत्साहात स्वागत
नाझरा(वार्ताहार):- सांगोला तालुक्यातील नाझरा विद्यामंदिर प्रशाला,ज्युनिअर कॉलेज व विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांनी मिळून नाझरा येथील मुख्य बाजारपेठेतून विधिवेत पूजा करून गणरायाचे स्वागत केले. त्यानंतर आटपाडी रोड, वीरभद्र मंदिर,शंकर चौक,संग्राम चौक येथून गणरायाची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. नाझरा विद्यामंदिर मध्ये प्राचार्य अमोल गायकवाड यांच्या हस्ते व नाझरा विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील,ज्येष्ठ शिक्षक विनायक पाटील यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून श्री ची प्रतिष्ठापना करण्यात आली.
त्यानंतर श्री ची आरती झाली.यावेळी ज्युनिअर कॉलेजमधील आसावरी सावंत व श्रावणी बनसोडे यांनी नृत्यांच्या माध्यमातून गणरायाचे स्वागत केले तर इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी “आमच्या पप्पांनी गणपती आणला” या लोकप्रिय गाण्यावर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर राही देशपांडे अनुष्का पाटील व अमृता वराडे यांनी अथर्वशीर्ष सादर केले. प्रशालेतील सहशिक्षक महालिंग पाटील व मारुती सरगर यांनी सर्व विद्यार्थ्यांना चिरमुरे,शेंगदाणे,डाळ्याचा प्रसाद दिला.संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव विभागातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर सर्वांचे आभार प्रा. महेश विभुते यांनी मानले.